esakal | पुण्यातील खासगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका!
sakal

बोलून बातमी शोधा

... म्हणून खासगी रुग्णालयांना आहे कोरोनाचा धोका!

पुण्यातील खासगी रुग्णालयांना महापालिकेचा दणका!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करताना अव्वाच्या सव्वा बिल लावण्याचे प्रकार घडतात. पण महापालिकेने नेमलेल्या ऑडिटरने बिलांची तपासणी करून गेल्या ११ महिन्यात ५ कोटी २१ लाख रुपयांचे बिल कमी करण्यास भाग पाडले आहे. याचा फायदा १ हजार ७२४ नागरिकांना झाला आहे.

मार्च २०२० मध्ये पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सामान्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांवर देखील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्ण संख्या वाढत असताना खासगी रुग्णालयाकडून रुग्णांकडून जास्त पैसे घेतल्या जात असल्याच्या तक्रारी येत सुरू झाल्या. पण त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने रुग्णालयावर वचक नव्हता. पुणे महापालिकेने रुग्णालयांचे दर नियंत्रणात राहावे यासाठी ऑगस्ट २०२० मध्ये उपचार, खाटा, रुमचे भाडे यासह इतर गोष्टींचे दर निश्‍चीत करून त्यापेक्षा जास्त पैसे घेण्यावर बंधने आणली. त्याच बरोबर रुग्णालयांमध्ये महापालिकेचे ऑडिटर नेमून रुग्णास दवाखान्यातून सोडताना बिल तपासून दिले जात होते. त्यामध्ये आक्षेप असतील तर त्वरित बिल कमी केले जाऊ लागले. त्याचा अनेक नागरिकांना फायदा झाला. तसेच काही रुग्णालयात महापालिकेचे ऑडिटर नाहीत व नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांच्याही तक्रारी स्वीकारून बिलांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: दंड भरा अन्यथा जमिनींवर बोजा...

डेक्कन परिसरातील पाच रुग्णालये

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून महापालिकेकडे १ हजार ७२४ तक्रारी आल्या असून, त्यांची तपासणी केली असता आत्तापर्यंत ५ कोटी २० लाख ९९ हजार ४१७ रुपयांचे बिल कमी करण्यात आले आहे. नागरिकांकडून नियमापेक्षा जास्त पैसे घेणारे प्रमुख पाच रुगणालयांपैकी दोन डेक्कन परिसरात आहेत. तर पुणे स्टेशन जवळील एक मोठे रुग्णालय, कात्रज परिसरातील मोठे रुग्णालय आणि एक सातारा रस्त्‍यावर पद्मावती जवळ आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

सात दिवसांत १८८ तक्रारी

एकीकडे शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी रुग्णालयांच्या तक्रारी कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत महापालिकेकडे १८८ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये १७ लाख २१ हजार ४२ रुपये बिल कमी केले आहे.

हेही वाचा: बनावट भाडेकराराला आळा बसणार; कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार

loading image