
पुणे: पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी उत्तम आणि पक्क्या इमारती आहेत. अद्ययावत यंत्रसामग्री आणि सर्व सोयीसुविधा असूनही डॉक्टरांअभावी येथील यंत्रणाच आजारी पडल्याचे धक्कादायक वास्तव ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले आहे.
लाखो पुणेकरांच्या आरोग्याची काळजी केवळ ३९ डॉक्टरांच्या हाती देण्यात आली आहे. अनेक दवाखान्यांमध्ये गळती, अस्वच्छता आहे. तसेच समाविष्ट गावांमध्ये कोणतीही सक्षम वैद्यकीय व्यवस्था महापालिकेने केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.