पुणे महापालिका; लिपिकपदाचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे महापालिका; लिपिकपदाचा निकाल जाहीर

पुणे : महापालिकेतील लिपिक पदाच्या २०० जागांच्या भरतीसाठी झालेल्या ऑनलाइन परिक्षेचा निकाल शनिवारी (ता. १२) जाहीर झाला. या पदासाठी तब्बल ५० हजार ९२ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यातील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, महापालिकेने सर्व सहा पदांचे ऑनलाइन निकाल जाहीर केले आहेत. आता कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया शिल्लक आहे.

महापालिकेत गेल्या १० वर्षांपासून पदभरती झालेली नव्हती, त्यामुळे प्राधान्यक्रम देऊन त्यानुसार नवीन पदभरती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात ४४८ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पाच, कनिष्ठ अभियंता वाहतूक नियोजन चार, कनिष्ठ अभियंता स्थापत्य १३५, सहायक विधी अधिकारी चार, सहायक अतिक्रमण अधिकारी १००, लिपिक टंकलेखक २००, अशा एकूण ४४८ जागांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले होते. त्यापैकी ६७ हजार २५४ जणांनी परीक्षा दिलेली होती.

गेले वर्षभर राज्यात आरोग्य भरती, म्हाडा भरती, टीईटी परीक्षा यामध्ये अनेक घोटाळे झाल्याने ही प्रकरणे गाजत आहेत. अनेक अधिकारी व परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी जेलमध्ये गेले. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने आतापर्यंतची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली आहे. ही ऑनलाइन परीक्षा ‘इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन’ (आयबीपीएस) या संस्थेकडून घेण्यात आली. सर्व पदांचे निकाल जाहीर झाले, तरी लिपिक पदाचा निकाल जाहीर झालेला नव्हता, त्यामुळे गेले काही दिवस प्रशासनाकडे वारंवार चौकशी सुरू होती.

या पदासाठी ५० हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली असून, सहा सत्रात परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक सत्रातील प्रश्‍नांची काठिण्य पातळी भिन्न होती, त्यामुळे ‘इक्वी पर्स्टेंटाइल’ ही गुणांकनाची पद्धत वापरून निकाल लावला आहे. तसेच या परिक्षेचा निकाल लावताना विषम गुण पडल्याबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. त्याबाबत प्रशासनाने खुलासा करत, जर सरासरी काढताना पॉइंटमध्ये गुण असतील, तर ते दुप्पट करताना विषम आकडा येतो, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.

तीन पदांची प्रक्रिया पूर्ण

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) आणि सहायक विधी अधिकारी या तीन पदांची निवडप्रक्रिया पूर्ण झाली असून, नियुक्ती पत्रही दिले आहे. महापालिका सेवेसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्याची प्रक्रिया सुरू आहे. सहायक अतिक्रमण निरीक्षक पदासाठी कागदपत्र पडताळणी सोमवारपासून सुरू होणार आहे, असे इथापे यांनी सांगितले. दरम्यान, लिपिक पदासाठी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणारे उमेदवार पात्र झाले आहेत. त्यामुळे २०० जागांसाठी १ः३ याप्रमाणे गुणवत्ता यादीतील सर्वाधिक गुण घेणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले जाईल.