पुणे महापालिकेच्या भरतीला ३० टक्के उमेदवार अनुपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पुणे महापालिकेच्या भरतीला ३० टक्के उमेदवार अनुपस्थित

पुणे : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी सोमवारी घेण्यात आलेल्या आॅनलाईन परीक्षेला नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवार गैरहजर राहिले. तर ७० टक्के उमेदवारांनी परीक्षा दिली.

महापालिकेने ४४८ रिक्त पदांसाठी नोकरभरती होणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक विधी अधिकारी, लिपीक या पदांचा समावेश आहे. यासाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले आहेत. ही परीक्षा आॅनलाईन व पारदर्शक व्हावी यासाठी महापालिकेने परीक्षेचे काम इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेला दिले आहे. या संस्थेने सोमवारी (२६ सप्टेंबर) पहिली परीक्षा घेतली.

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी २ हजार २६४ उमेदवारांनी अर्ज केले होते. यापैकी १ हजार ५७५ उमेदवारांनी परीक्षा दिली. दोनशे गुणांच्या या ऑनलाइन परीक्षेत उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.

उपायुक्त सचिन इथापे म्हणाले, महापालिकेच्या भरतीची पहिली परीक्षा सुरळीतपणे पार पडली. यामध्ये ७० टक्के उमेदवारांनी पेपरला उपस्थिती लावली. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी तीन ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. चार ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी; तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल. लिपीक पदासाठी सर्वाधिक ६३ हजार ६५६ अर्ज आल्याने ही परीक्षा तीन ते चार दिवस चालणार आहे. याबाबतची माहिती उमेदवारांना नोंदणी केलेल्या मेल आयडी व मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे दिली जाईल.