
पुणे महापालिकेने मागितली निवडणूक आयोगकडे मुदतवाढ
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीवर तब्बल ४ हजार २७३ हरकती आलेल्या आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी लागणार असल्याने ९ जुलै पर्यंत अंतिम मतदार यादी तयार करणे अवघड आहे. त्यामुळे महापालिकेने ही मुदत २३ जुलै पर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीची फोड करून तीनच्या प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली. पण ही मतदार यादी तयार करताना मोठ्याप्रमाणात घोळ झाला आहे. बहुतांश सर्व प्रभागातील हजारो मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत.
त्यामुळे हक्काचे मतदार दुसरीकडे गेल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच यामध्ये प्रारूप यादी तयार करताना क्षेत्रीय कार्यालयावर राजकीय पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांनी दिलेली नावे यादीत टाकली आहेत. त्यात अनेक बोगस मतदार टाकल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसणार आहे असाही आरोप झाला होता. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी व हरकती नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिकेने ३ जुलैच्या पुढे मुदतवाढ दिलेली नसली तरी आलेल्या सर्व हरकतींचा निपटारा करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहे. प्रारूप यादीवर हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १ हजार ७४७ हरकती नोंदविण्यात आल्या, तर एकूण हरकतींची संख्या ४ हजार २७३ इतकी आहे. राजकीय पक्षांकडून ५६२ हरकती आलेल्या आहेत.
या हरकतींवर कार्यवाही करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ९ जुलै पर्यंत हे काम पूर्ण होणार नसल्याने यासाठी २३ जुलै पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांकडे केली आहे. सध्या प्रत्येक प्रभागात २५ कर्मचाऱ्यांचे पथक या कामासाठी नियुक्त केले आहे.
आरपीआयने पत्रकार परिषद घेऊन प्रारूप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी आणखी मुदतवाढ मागितली आहे. मतदार यादीत मोठा घोळ झाला आहे. त्याचा परिणाम निवडणुकीनंतरही भोगावा लागेल, असे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहाध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर यांनी केली.