Scholarship Scheme : आचारसंहितेत अडकणार पुणे महापालिकेची शिष्यवृत्ती योजना?

पुणे महापालिकेतर्फे शहरातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

पुणे - इयत्ता अकरावी आणि पदवीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली असताना पुणे महापालिकेने अद्यापही गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागविण्यास सुरवात केली नाही. त्यामुळे आगामी वर्षात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असताना मार्च महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणे आवश्यक आहे, अन्यथा तांत्रिक अडचणींमध्ये हे प्रस्ताव पडून राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेतर्फे शहरातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. त्यामध्ये इयत्ता दहावी आणि बारावीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्यांना अनुक्रमे ‘भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद’ योजनेतून १५ हजार आणि ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ योजनेतून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.

गतवर्षी जूनपर्यंत जमा झाले पैसे

इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल लागून दोन महिने झाले असले तरी अद्यापही महापालिकेने विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यास सुरवात केलेली नाही. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील वर्गासाठी प्रवेश घेतला आहे, त्याचा त्यांना पुरावा जोडावा लागतो. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यास त्यानंतर जाहीर प्रकटन देऊन अर्ज मागविले जाणार आहेत.

साधारणपणे अर्ज भरण्यासाठी महापालिकेकडून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर अर्ज व कागदपत्रांची आॅनलाइन छाननी करण्यासाठी वेळ लागतो. महापालिका प्रशासनाकडून जानेवारीत पैसे दिले जातील, असा दावा केला जात असला तरी कागदपत्रांची छाननी केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे बिल तयार करणे, त्याची लेखा विभागाकडून तपासणी करून घेणे यामध्ये बराच कालावधी जातो.

गेल्यावर्षी २०२२-२३ या वर्षात १० हजार ९२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी ३ हजार २३५ विद्यार्थ्यांनाच मार्च अखेरपर्यंत पैसे मिळाले होते. उर्वरित विद्यार्थ्यांना मे-जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागली होती.

मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता?

आगामी एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने त्याची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होऊ शकते. तसेच, एक एप्रिल २०२४ पासून नवे आर्थिक वर्ष सुरू होते. आचारसंहितेच्या काळात शासकीय योजनांचा लाभ देण्यावर बंधने येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळतीलच, याची खात्री नाही. तसेच, आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी रक्कम खर्ची पडली नाही तर तिचा अन्यत्र विनियोग केला जातो. त्यामुळे शिष्यवृत्ती देण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. या दोन अडचणींमुळे महापालिका प्रशासनाला त्यापूर्वी शिष्यवृत्तीचे सर्व प्रस्ताव मान्य करून घेणे आवश्‍यक आहे.

प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले नाहीत. पण सप्टेंबरमध्ये अर्ज मागविण्यास सुरवात केली जाईल. विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याने आचारसंहितेची अडचण होणार नाही. आम्ही जानेवारीअखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे पैसे बँक खात्यात जमा करू.

- नितीन उदास, उपायुक्त, समाजविकास विभाग

ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांचे अर्ज महापालिकेने स्वीकारण्यास सुरवात करावी. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेवर ताण येणार नाही आणि कोणत्याही तांत्रिक व कायद्याच्या अडचणीत न अडकता टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा होऊ शकते. महापालिकेने अर्ज कधीपासून स्वीकारले जाणार, याची तारीख लवकर जाहीर करावी.

- हर्षदा कोंढरे, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com