सदाशिव पेठेतील खानावळ सील; कोरोनाचे नियम न पाळल्याने पुणे महापालिकेचा दणका

ब्रिजमोहन पाटील
Saturday, 20 February 2021

खानावळ सील करून खानावळ मालकास रक्कम रुपये ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नियमांचे पालन न केल्याने पुणे महापालिकेने सदाशिव पेठेतील एका खानावळीला सील ठोकून पाच हजार रुपये दंड वसूल करून दणका दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आलेले आहे. तरीही अद्याप अनेक नागरिक मास्क न लावता, सोशल डिस्टंसिंग ठेवता शहरात बिनधास्त फिरत आहेत. त्याचप्रमाणे दुकाने, हॉटेल येथेही सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. 

पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण

महापालिकेच्या कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातर्फे केलेल्या पाहणीत 
सदाशिव पेठेतील स्वप्निल खानावळ (मेस) मध्ये सोशल डिस्टन पालन केले जात नव्हते, सॅनिटायझर ठेवलेले नव्हते, तेथील कामगार आणि इतरांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तसेच थरमल गन नसणे, ग्राहकांची नोंद नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे  महापालिका सह आयुक्त आशिष महाडदळकर याच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील मोहिते, आरोग्य निरीक्षक रविराज बेन्द्रे आणि मुकादम रविंद्र कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. खानावळ सील करून खानावळ मालकास रक्कम रुपये ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation sealed mess in Sadashiv Peth for not following Corona preventing rules