
पुणे : पुणेकरांनो, तुम्ही नको त्या कामांसाठी रस्त्यांवर उतरताय, नको तिथे अन् नको तेवढी गर्दी करताय, तसेच मास्कही बांधत नाही आहात, वाहनांमधून चार-पाचजण बिनधास्त फिरताय...हे सगळे आता कोरोनासाठी घातक ठरतेय...पण कोणीच फारशी काळजी घेत नाही...म्हणूनच आता तुम्ही चार-चौघेजण घराबाहेर पाय ठेवताच महापालिका तुम्हाला जाब विचारणा आहे; तर अत्यावश्यक काम नसतानाही दोनपेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यांवर एकत्र दिसल्यास दंडही वसूल केला जाणार आहे. तसेच आता रस्त्यांवरील गर्दीला थारा देणाऱ्या दुकानांवरही कारवाई होईल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आणि अन्य यंत्रणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, रुग्णसंख्येत वाढच होत आहे. ही बाब महापालिकेने गंभीर्याने घेतली आहे. त्यातून सध्याच्या व्यवहारांच्या नियमांच्या अंमलबजावणीवर भर देत, सुरक्षिततेची बंधणे पाळली जात आहेत का, यावर महापालिका आता बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
सध्याच्या स्थितीत "सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य देण्याची गरज असूनही त्याकडे सर्रास काणाडोळा होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोना पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यावर कठोर उपाय म्हणून एकाच वेळी रस्त्यांवर उतरणाऱ्या नागरिकांसाठीही बंधने घालून, सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे वैद्यकीय कारण वगळता अन्य कामांसाठी दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र ये-जा करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय, एखाद्या दुकानासमोर गर्दी करता येणार नाही; तरीही ती झाल्यास आता दुकानदारांसह नागरिकांवरही दंडात्मक कारवाई होणार आहे. दुसरीकडे, आजघडीला अनेकजण मास्क न वापरताच रस्त्यांवर येत असल्याचे दिसत आहे. अशा लोकांवर सतत कारवाई करूनही परिणाम होत नसल्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
यासंदर्भात नवे नियम ठरविण्यासाठी बैठक घेऊन आदेश काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना सांगितले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, "कोरोनाच्या वाढीचा वेग पाहता नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने आता सार्वजनिक फिरताना बंधने असतील व ती न पाळणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होईल. त्याबाबत शुक्रवारी बैठक होईल आणि तसे आदेश काढण्यात येतील.''
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 40 लाख पुणेकरांचा आरोग्य विमा उतरविण्याची सूचना महापालिकेतील गटनेत्यांनी प्रशासनाला केली आहे. तसेच, खासगी हॉस्पिटलसह छोटे क्लिनिक आणि अन्य डॉक्टरांना महापालिकेच्या मदतीला घेण्यासाठी पावले उचलावीत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. अशा सूचनांबाबत बैठक घेऊन शक्य तेवढी कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.