

पुणे - महापालिका निवडणुका (Municipal Election) जवळ आलेल्या असताना ॲमिनिटी स्पेस भाड्याने देणे, फ्लॅट विक्री, नदीसुधार प्रकल्प यांसह इतर प्रस्ताव विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहेत. असे असताना आता या सर्वच विषयांना विरोध करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. जागा भाड्याने देऊन पुणेकरांचे हित जपणे अशक्य आहे, नदीत मैलापाणी असताना नदीचे सुशोभीकरण योग्य नाही, त्यामुळे आगामी काळात महापालिकेत या विषयांना विरोध करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
यावर भाजपने शहराच्या विकासात ‘खो’ घालण्याचा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला जाईल, असे प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेच्या २७० ॲमिनिटी स्पेसच्या जागा (सुविधा क्षेत्र) भाड्याने देण्याच्या प्रस्तावावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी अजित पवार यांनी आज (रविवारी) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. बैठकीमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून झालेल्या गोंधळाबाबत चौकशी केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल चुकीचा अर्थ काढला गेल्याने तशा बातम्या आल्या, असा खुलासा पवार यांच्याकडे करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक पदाधिकाऱ्यांची भूमिका ऐकून घेतली. त्यामध्ये ॲमिनिटी स्पेसच्या मुद्द्याला पूर्ण विरोध केला पाहिजे. हा प्रस्ताव फसवा आहे, डीपीतील आरक्षणे उठविण्याचा हा घाट असल्याने भाजपसोबत जाणे योग्य नाही, असे मत काही पदाधिकाऱ्यांनी मांडले.
ॲमेनिटी स्पेस भाड्याने देताना ३३ टक्के जागा अर्बन फॉरेस्टसाठी व ३३ टक्के जागा शाळा व रुग्णालयांसाठी असली पाहिजे, या जागांच्या वापराचा मास्टर प्लॅन तयार करावा, त्यावर महापालिकेने नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या पाहिजेत, त्यानंतरच यास पाठिंब्याचा विचार केला पाहिजे, अशी चर्चा करण्यात आली. पण सध्या या प्रस्तावास विरोध केला पाहिजे, असेही मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अजित पवार यांनी सर्वांची भूमिका ऐकून घेत, मुख्यसभेत ॲमिनिटी स्पेसला विरोध करा असे सांगितले. भाजपने बहुमताच्या जोरावर विषय मंजूर केला तर राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल असेही स्पष्ट केले.
फ्लॅट विक्रीला विरोध
महापालिकेला बिल्डरांकडून मिळालेले १९४० फ्लॅट विक्री करून, त्यातून सुमारे ५०० कोटी रुपये मिळतील असा प्रस्ताव आहे. यास देखील विरोध केला जाणार आहे. महापालिकेचे विविध प्रकल्प सुरू असतात त्यात पुनर्वसन करताना नागरिकांना फ्लॅटची गरज असल्याने हे विक्री करू नये अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच सात वर्षांसाठी सुरक्षा रक्षकांचा ठेका मर्जीतील ठेकेदाराला दिला जाणार आहे हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, त्यासही विरोध करा असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
नदीमध्ये मैलापाणी असताना केवळ सुशोभीकरण करणे योग्य नाही, त्यामुळे आधी नदी स्वच्छ झाली पाहिजे, त्यानंतरच नदी सुधार प्रकल्प झाला पाहिजे. त्याच प्रमाणे महापालिकेचे फ्लॅट विक्री करणे चुकीचे आहे अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. या प्रकल्पांना विरोध केला जाईल.
- चेतन तुपे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
विकासाच्या कामात राजकारण करण्याची परंपरा नाही, पण त्यामुळे राष्ट्रवादीकडून होणारा विरोध योग्य नाही. शहराला मागे घेऊन जाणारा हा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडू. राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शहराच्या विकासाला बसणार आहे.
- गणेश बीडकर, सभागृहनेते, भाजप
नदी सुधार प्रकल्पालादेखील खो
महापालिकेने साबरमती नदीच्या धर्तीवर पुण्यातील नदीचे सुशोभीकरण करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प आखला आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वी यास गती देण्याचा प्रयत्न आहे. मात्र, यास राष्ट्रवादीने विरोध केला. आधी नदीचे पाणी स्वच्छ झाले पाहिजे, मैलापाणी वाहून येणारी यंत्रणा म्हणजेच ‘जायका’ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच याचा विचार झाला पाहिजे, असे बैठकीत सांगण्यात आले. त्यानुसार विरोध करण्याचे ठरले.
३३ टक्के अर्बन फॉरेस्ट व मास्टर प्लॅन भाजपने तयार केला नाही आणि या बदलास त्यास पाठिंबा देण्याची भूमिका ती त्या दिवसापुरतीच मर्यादित होती. आता त्याचा काही संबंध नाही, त्यामुळे या प्रस्तावास विरोध केला जाईल, असे बैठकीत ठरले आहे.
- ॲड. वंदना चव्हाण, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.