पुणे महापालिका भरती डोकेदुखी वाढवणारी

पुणे महापालिकेत तब्बल १० वर्षांनंतर पदभरती होत आहे. या भरतीसाठी ‘आयपीबीएस’ या संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

पुणे महापालिकेत तब्बल १० वर्षांनंतर पदभरती होत आहे. या भरतीसाठी ‘आयपीबीएस’ या संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

पुणे - पुणे महापालिकेने ४४८ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. लिपिकपद वगळता इतर सर्व पदांच्या ऑनलाइन परीक्षेचे निकाल जाहीर होऊन कागदपत्र पडताळणी सुरू झाली आहे. पण ही कागदपत्र पडताळणी करताना अनुभव प्रमाणपत्राचा जुगाड करून बनावट अनुभव पत्र देण्याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत पारदर्शक झालेली भरती प्रक्रिया पुढील टप्‍प्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडे याबाबत तक्रारी आल्याने खोलवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याची भूमिका घेतली आहे.

पुणे महापालिकेत तब्बल १० वर्षांनंतर पदभरती होत आहे. या भरतीसाठी ‘आयपीबीएस’ या संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि लिपिक पदासाठी आलेले होते, त्यामुळे या पदांसाठी सर्वाधिक स्पर्धा आहे. कनिष्ठ अभियंता पदाचा निकाल लागल्यानंतर १३५ जागांसाठी एकास तीन प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. त्यानुसार सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. अद्याप १०० उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी शिल्लक आहे. तर लिपिक पदाच्या आॅनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही.

पडताळणीसाठी हे आवश्‍यक

उमेदवाराच्या अनुभव प्रमाणपत्रासोबत त्याची वेतन चिठ्ठी, बँक विवरण, भविष्य निर्वाह निधीत जमा झालेली रक्कम व कधीपासून रक्कम जमा होत आहे याचे विवरण, फॉर्म १६ आणि या सर्व गोष्टी सनदी लेखापरीक्षकाकडून (सीए) तपासून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर चाप बसू शकले, अशी मागणी राहुल कवठेकर यांनी केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या तक्रारी

अभियांत्रिकी शाखेचे कागदपत्र तपासणी सुरू होत असताना अनेक उमेदवारांनी वैयक्तीक पातळीवर प्रशासनाकडे बनावट कागदपत्र तपासणीसाठी सादर केले जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये २०१९ ला जे विद्यार्थी पदवी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी तीन वर्षांचा अनुभव दाखवला आहे. तसेच माजी सैनिक या आरक्षीत पदासाठी ४५ वर्षांची अट असताना काही जण त्यापेक्षा कमी वयाचे असल्याचेही समोर येत आहे. तसेच अनुभव प्रमाणपत्रासाठी काही ठेकेदार किंवा बांधकाम व्यावसायिकाकडे काम केल्याचे खोटे अनुभव प्रमाणपत्र तयार केले आहेत. असे उमेदवार निवडले जाऊ नयेत, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

अशी होणार भरती

१३५ - स्थापत्य शाखा अभियंता

५ - यांत्रिकी शाखा अभियंता

४ - वाहतूक नियोजन अभियंता

१०० - सहायक अतिक्रमण निरीक्षक

२०० - लिपिक

४ - सहायक विधी अधिकारी

८६, ९९४ - ऑनलाइन परीक्षा अर्ज

६७, २५४ - परीक्षा दिलेले उमेदवार

राज्य सरकारच्या भरतीत गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यानंतर मोठे गैरव्यवहार समोर आले. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता व इतर पदाच्या भरतीमध्ये बनावट कागदपत्र सादर केली जात आहेत. जे उमेदवार पदवी प्राप्त करून तीन वर्ष झाले नाहीत, अशांनी तीन वर्षांचा अनुभवाचा दाखला दिला आहे. त्यामुळे केवळ दाखल्यावर अवलंबून न राहता खरेच काम केले आहे का?, याची सखोल पडताळणी केली तरच यात गैरव्यवहार होणार नाहीत. तसेच महापालिकेच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांचे निकटवर्तीय निवडले गेले आहेत का?, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

- राहुल कवठेकर, एमपीएससी समन्वय समिती

कागदपत्र पडताळणीमध्ये खोटे अनुभव प्रमाणपत्र व इतर कागदपत्र दिल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे काटेकोरपणे कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. सर्वात शेवटी आमच्या स्तरावरही पडताळणी केली जाईल. चुकीच्या पद्धतीने उमेदवार निवडला जाणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत.

- सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

गैरव्यवहाराची शक्यता

पुणे महापालिकेने ४४८ पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र यात बनावट अनुभव पत्र देण्याबाबत अनेक तक्रारी येत आहेत. यातून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. याबाबत आपल्या प्रतिक्रया नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com