
गणेश मंडळांना थेट पाच वर्षासाठी मांडव घालण्याचा परवाना देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तयारी दाखवली आहे.
गणेश मंडळांना मांडवासाठी पाच वर्षाचा परवाना देण्यास पुणे पालिका तयार
पुणे - गणेश मंडळांना थेट पाच वर्षासाठी मांडव घालण्याचा परवाना देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तयारी दाखवली आहे. आम्हाला परवाना देण्यासाठी काहीच अडचण नाही, पण पोलिसांनी त्याबाबत निर्णय घ्यावा असे विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोरोनामुळे गेली दोन गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडले होते. पण यंदा कोरोनाचे संकट नसल्याने निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी कंबर कसली आहे. मांडव, देखावे याच्या तयारीची गडबड सुरू झाली आहे. मंडळांना मांडव घालण्यासाठी दरवर्षी पोलिस आणि महापालिकेच्या परवानग्या घ्याव्या लागतात. वारंवार बैठका घेऊनही ही किचकट प्रक्रिया सुलभ झालेली नाही, ना हरकत प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करताना कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ होते.
पोलिस व महापालिकेच्या यंत्रणेवर ताण आलेला असतो. अखेर शेवटच्या दिवशी कसातरी परवाना मिळतो अशी सद्यःस्थिती आहे. त्यामुळे २०२० मध्ये दिलेल्या परवानगीनुसार, पुढील पाच वर्षे परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.
त्याबाबत विचारले असताना आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘गणेश मंडळांना पाच वर्षांसाठी परवाना देण्यासाठी महापालिकेला अडचण नाही, पोलिसांनी त्यासाठी तयारी दाखविल्यास अंमलबजावणी शक्य आहे.’’
विसर्जन मिरवणुकीच्या प्रारंभाची जागा बदलणार?
पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता होताना दिमाखदार विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंडईतील लोकमान्य पुतळ्यापासून होते. पण सध्या मंडईमध्ये मेट्रो स्टेशनचे काम सुरू असल्याने या परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नाही, सुरक्षेच्या कारणास्तव बॅरीकेडींग करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणूक सुरू करणे अवघड असल्याने ही जागा बदलावी लागणार आहे. त्यासाठी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.
Web Title: Pune Municipality Is Ready To Grant Five Year License To Ganesh Mandals For Mandap Commissioner Vikram Kumar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..