Pune : पालिकेकडून पाण्याचा टँकर दोन दिवसांतून एकदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Water tanker

Pune : पालिकेकडून पाण्याचा टँकर दोन दिवसांतून एकदा

उंड्री : नव्याने महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या हांडेवाडी (स.नं.३१७) परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. हांडेवाडी परिसरामध्ये राज्य-परराज्यातून मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग स्थायिक झाला आहे. पालिकेकडून पाण्याचा टँकर दोन दिवसांतून एकवेळ येतो, त्यामुळे येथील पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. किमान पाणी, रस्ते, पथदिवे, आरोग्य सुविधा अशा किमान सुविधादेखील मिळत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.

हांडेवाडीमधील आदर्शनगर, दुगड चाळ, ऋतुजा पार्क सोसायटी, स्वप्नविश्व पार्क सोसायटी, यशश्री पार्क, इनामदार पार्क, स्वप्नश्री पार्क या परिसरामध्ये सुमारे सात-आठ हजार नागरीवस्ती आहे. या परिसरामध्ये अंशतः जलवाहिनी टाकली असून, जवळच सेलेना पार्कमधील पाण्याची टाकी आहे. मात्र, पाण्याच्या टाकीची जलवाहिनी जोडली नाही, त्यामुळे पाणी मिळत नाही. सेलेना टाकीतून पाणीपुरवठा करावा, यासाठी लष्कर पाणीपुरवठा विभागाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून दखल घेतली नाही, असे येथील नागरिकांच्या वतीने अनुराधा जगताप, अनिता महातो, पुष्पा शहा, नूतन शर्मा, कल्पना पाटील, रेखा काटकर, सोनाली वनवे, अंजन पाटील, सुरेखा कोळी यांनी सांगितले.

पालिकेने हांडेवाडी रस्ता, बडदेमळा, भुजबळ स्कीम येथील ३५ लाख लीटर क्षमतेच्या टाकीचे रखडलेले काम मार्गी लावावे. पालिकेला आम्ही कर भरतो, त्या बदल्यात किमान पिण्यासाठी पाणी तरी द्या.

-मीनाक्षी तोडकर, आदर्शनगर

आज ना उद्या मुलभूत सुविधा मिळतील, या आशेवर यशश्री पार्क, दगड चाळ, आदर्श नगर परिसरामध्ये घर घेतले. मात्र, आजही मुलभूत सुविधा कोसो दूर आहेत. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.

-ज्ञानेश्वर राऊत, ऋतुजा पार्क

दरम्यान, लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले की, अभियंत्यांकडून परिसरातील जलवाहिनी आणि तांत्रिक बाबींची पाहणी करून उपाययोजना केली जाईल. सेलेना पार्क पाण्याच्या टाकी परिसरातील नागरिकांना पूर्वी दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, तो आता दररोज केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उंड्री ः दुगड चाळीमध्ये टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी.