जबरदस्तीस विरोध केल्यामुळे मनोरुग्ण महिलेचा खुन; कचरावेचकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

पहाटेच्यावेळी फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलेस जबरदस्ती केल्यानंतर तिने विरोध केल्यामुळे महिलेचा खुन केल्याचे उघड झाले.

जबरदस्तीस विरोध केल्यामुळे मनोरुग्ण महिलेचा खुन; कचरावेचकास अटक

पुणे - पहाटेच्यावेळी फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलेस जबरदस्ती केल्यानंतर तिने विरोध केल्यामुळे महिलेचा खुन केल्याचे उघड झाले आहे. येरवडा पोलिसांनी महिलेचा खुन करणाऱ्या कचरावेचकास अटक केली आहे.

सतिष संतोष हारवडे (वय 45 , रा. येरवडा) असे अटक केलेल्या कचरावेचकाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पर्णकुटी पायथा परिसरात एक ऑगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर खुन झालेल्या महिलेची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित महिला मनोरुग्ण असून घटनास्थळापासून काही अंतरावचर ती कुटुंबासमवेत राहत होती. मात्र तिची मानकिस स्थिती ठिक नसल्याने ती अनेकदा घराबाहेर निघून जात होती. त्याचपद्धतीने मागील आठवड्यातही ती घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावरुन टोपी व चप्पल सापडली होती. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, येरवडा पोलिस या खुनाचा तपास करीत होते. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर टोपी घातलेली एक व्यक्ती कचरा वेचत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी भंगार माल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांकडे संबंधित व्यक्तीबाबत चौकशी सुरू केली. तेव्हा, संशयित व्यक्ती हा नदीपात्रातील चिमा घाट परिसरातील बाकावर झोपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. तेव्हा, त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा घटनेच्या दिवशी त्याने पहाटेच्यावेळी एकट्यानेच फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेने त्यास विरोध केला. त्यामुळे त्याने महिलेचा खुन केल्याची कबुली दिली.