पुणे : मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुठा उजवा

पुणे : मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार

पुणे: खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यामधून पाणी नेण्याच्या योजनेमुळे सध्या असलेले कालव्याचे अंतर दहा किलोमीटरने कमी होणार आहे. सध्याचा कालवा ३५ किलोमीटर लांबीचा आहे, तर बोगदा २५ किलोमीटर लांबीचा असणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास जवळपास अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.

खडकवासला धरणातून कालव्यात सोडले जाणारे पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय, कालव्यात पडणाऱ्या कचऱ्यामुळे पाणी प्रदूषित होते. यासर्व पार्श्‍वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखली होती. मात्र, त्यासाठी निधी कसा उभारावा, याबाबतचा प्रश्‍न होता. त्यामुळे ही योजना गेली अनेक वर्ष रखडली होती. मध्यंतरी पुन्हा या योजनेला चालना देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार निविदा मागवून एका खासगी कंपनीला हे काम दिले आहे. दोन महिन्यात हे सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत.

सुमारे दीड हजार कोटींचा खर्च

खडकवासला धरण ते फुरसुंगी हा कालवा बंद करून त्याऐवजी भूमिगत बोगद्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे एक हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान कालव्यालगत असलेली सुमारे दोन हजार हेक्‍टर जागा आहे. त्याचा व्यावसायिक पद्धतीने वापर केल्यास त्यातून मोठा निधी उभा राहू शकतो. या निधीतून बोगद्यासाठी येणारा खर्च करावा, असा विचार मध्यंतरी पुढे आला होता. त्यासाठी या जागेचा सविस्तर प्रकल्प अहवाल ‘पीएमआरडीए’ने करावा, असे जलसंपदा विभागाने ‘पीएमआरडीए’ला कळविले होते. तसे केल्यास बाष्पीभवन आणि गळतीमुळे होणारा पाण्याचा लॉस भरून निघण्यास मदत होईल. त्यातून सुमारे अडीच टीएमसी पाणी वर्षभरामध्ये वाचणार आहे. मात्र, ‘पीएमआरडीए’ने त्यास नकार दिला होता. त्यामुळे आता खुद्द जलसंपदा विभागानेच हा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

Web Title: Pune Mutha Right Canal Distance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top