
Pune : नारायणगावात भंगार दुकानाला आग ; प्लॅस्टिकचे भंगार साहित्य जळून खाक
नारायणगाव : येथील कोल्हे मळा- ओझर रस्त्यालगत असलेल्या ताहीर अली शेख यांच्या भंगार दुकानाला आज दुपारी आग लागली. आगीत प्लॅस्टिकचे भंगार साहित्य जळून खाक झाले. ताहीर अली शेख यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले.
तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे , अमित नारूडकर, भाऊ खैरे , कमलेश विश्वकर्मा ,साहिल मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांनी पाण्याचा टँकर आणून आग आटोक्यात आणली
.या मुळे आग पसरण्याचा धोका टळला. आगीचे कारण समजू शकले नाही. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोल्हे मळा- ओझर रस्त्यालगत असलेल्या ताहीर अली शेख यांच्या भंगार दुकानाला आग लागली.आग विझविण्यासाठी जुन्नर नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागवण्यात आला.
अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होण्यास सुमारे पाऊण तास लागला. दरम्यान स्थानिक नागरिकांना पाण्याचा टँकर आणून बादली व पाईपने पाणी मारून आग आटोक्यात आणली. या मुळे शेजारील दुकानात आग लागण्याचा धोका टळला.
वर्षातील चौथी घटना: नारायणगाव ,वारूळवाडी व चौदा नंबर परिसरामध्ये यापूर्वी आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या दळवी मसाले यांच्या तीन व्यापारी गळ्यांना आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. नारायणगाव येथील श्रीराम चौकातील कापड दुकानाला आग लागून दुकान बेचिराख झाले होते.
पाच महिन्या पूर्वी चौदा नंबर येथील विक्रम डेकोरेटरच्या गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे मंडप व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले होते.आगीचा बंब जुन्नर व खेड येथे आहे. आग लागल्यानंतर बंब येण्यास अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. आग विझविण्यास उशीर होतो. तो पर्यत आगीचा भडका उडून मोठे नुकसान होते.
नारायणगाव ही तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे. आगीचा धोका ओळखून नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतने अग्निशामक बंबाची व्यवस्था करावी. अशी मागणी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे यांनी केली आहे.