पुणे : महाराष्ट्राचा 'सुसंस्कृत' चेहरा सर्वांनी जपावा; अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Occasion on Maharashtra day Deputy Chief Minister Ajit Pawar

पुणे : महाराष्ट्राचा 'सुसंस्कृत' चेहरा सर्वांनी जपावा; अजित पवार

पुणे : पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याचे प्रयत्न करताना महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे कार्य केले. यापुढील काळातही राज्याचा सुसंस्कृत चेहरा जपण्याचे कार्य सर्वांनी मिळून करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

ते म्हणाले, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे रहायला हवा. पायाभूत सुविधांची उभारणी करताना सामाजिक सुधारणांनाही महत्त्व देण्यात येत आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचे स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

विकासासाठी राज्य शासन दृढसंकल्प

राज्य आणि पुण्याच्या विकासासाठी राज्य सरकारचा दृढसंकल्प आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत त्यादृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पातूनही राज्याच्या विकासाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जुन्नर तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत आहे. पेरणे फाटा येथील जयस्तंभ परिसर विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. अष्टविनायक परिसर विकासासोबत प्राचीन मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन अंतर्गत एकवीरा देवी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. राजगड, तोरणा, शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनाची कार्यवाही गतीने सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त ‘इंद्रायणी मेडिसिटी’ नावाने भव्य वैद्यकीय वसाहत स्थापन करण्यात येत आहे. नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वेच्या १६ हजार ३९ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूसंपादन सुरु आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे सुरू झाले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पवार म्हणाले, पुणे शहर परिसरातील अंतर्गत व बाह्य रिंगरोडसाठी अर्थसंकल्पात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्यात येत आहे. सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक तीन हजार ८९३ कोटींचे पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले. पुणे‍ जिल्हा परिषदेने २०२१-२२ मध्ये विविध विकासकामांसाठी एक हजार कोटी रुपये खर्च करत गतवर्षी १५ हजार कामे पूर्ण केली आहेत. त्याबद्दल पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापनदिन साजरा करताना बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील मराठी भाषक गावे अजूनही महाराष्ट्रात सामील होऊ शकली नाहीत, याची खंत व्यक्त केली. सीमाभागातील मराठी भाषक बांधवांचा महाराष्ट्रात सामील होण्यासाठीच्या लढ्याला, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.