दिमाखदार सोहळ्याद्वारे पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Navratra Mahotsav

गायन, वादन, नृत्य आदी कलांचा मिलाफ असलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे सोमवारी उदघाटन झाले.

दिमाखदार सोहळ्याद्वारे पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन

पुणे - गायन, वादन, नृत्य आदी कलांचा मिलाफ असलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे सोमवारी उदघाटन झाले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला. दसऱ्यापर्यंत म्हणजेच ५ ऑक्टोबरपर्यंत रंगणाऱ्या या महोत्सवात पुणेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे.

दैनिक 'सकाळ' आणि 'साम टीव्ही' या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, ‘‘नवरात्रीचा महोत्सव हा स्त्रीशक्तीचा उपासनेचा आहे, देवीच्या आराधनेचा आहे. स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या घटना ऐकल्यावर मन व्यथित होते. पण हे अत्याचार करणारे आरोपी तुरुंगातून बाहेर येतात आणि त्यांचा सत्कारही होतो. आई जगदंबेला हे आवडेल का? अशा लोकांना ती नक्कीच आशीर्वाद देणार नाही.’’

याप्रसंगी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, महोत्सवाचे प्रमुख आबा बागूल, जयश्री बागूल आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लावणी कलावंत प्रियांका गौतम यांना ‘लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘ महोत्सव सुरु करणे सोपे असते, मात्र चालू ठेवणे अवघड असते. गेली २८ वर्षे हा महोत्सव सुरु आहे, हे केवळ श्री लक्ष्मी मातेच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे’, असे आबा बागूल यांनी प्रास्ताविकात सांगितले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. घनशांम सावंत‌ यांनी आभार मानले.

मिश्कील राजकीय टिप्पण्या

‘आबा बागूल यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य कार्यक्रम केला. पण बाळासाहेब, त्यांना गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम करू द्या. त्यासाठी त्यांना विधानसभेत घेऊन जा’, अशी मिश्किल टिप्पणी अंकुश काकडे यांनी केली. तसेच, ‘तुम्ही खूप चांगले काम करत आहात, पण कधी गरज भासल्यास घड्याळ पाहा’, असे आमंत्रणही बागूल यांना दिले. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी ‘अंकुश काकडे यांनाच अद्याप संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीत त्यांना संधी मिळेल, असे वाटत नाही. असे असताना काकडे यांनी आबांना ऑफर देणे योग्य नाही. उलट त्यांनीच आमची ऑफर स्विकारावी’, असे मिश्किल प्रत्युत्तर दिले.

कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

उद्घाटन सोहळ्यात प्रारंभी नादरूप संस्थेतर्फे ‘महाकाली चंड चामुंडा’, रत्ना दहिवलेकर व सहकाऱ्यांचा ‘महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री’, विनोद धोकटे व स्वाती धोकटे यांचा ‘अवतार जगदंबेचा’ आणि सँडी डान्स अ‍ॅकेडमीतर्फे ‘बॉलिवूड २०२२’ हे नृत्याविष्कार सादर झाले. कार्यक्रमाची सांगता ‘पायलवृंद’तर्फे निकिता मोघे दिग्दर्शित ‘कॅलिडोस्कोप’ या नृत्याविष्काराने झाली. यात अभिनेत्री पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव आणि नुपूर दैठणकर सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Navratri Festivalpune