esakal | पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात I Navratrotsav
sakal

बोलून बातमी शोधा

Navratrotsav

पुणे : शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - आदिशक्तीचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची आजपासून शहरात उत्साहात सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि विधिवत पूजेसह मंगलमय वातावरणात घरोघरी घटस्थापना झाली. काही ठिकाणी देवीच्या मूर्तीचे आणि प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, महालक्ष्मी मंदिर, तळजाई मंदिर, चतुःशृंगी देवस्थान आदी मंदिरांत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. मंदिरे खुली करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी गर्दी केली. तर सार्वजनिक मंडळांनीही वाद्यांच्या गजरात दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली.

प्रमुख मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना

ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर - तांबडी जोगेश्वरी मंदिरात सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी घटस्थापना केली. ६ वाजता आरती झाल्यानंतर ६ वाजून ३० मिनिटांनी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले. रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असेल, अशी माहिती विश्वस्त पल्लवी बेंद्रे यांनी दिली.

महालक्ष्मी मंदिर - सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात विश्वस्त अमिता अग्रवाल आणि राजकुमार अग्रवाल यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यंदा नवरात्रोत्सवानिमित्त पद्ममंदिराची प्रतिकृती साकारली आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पाच कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे.

चतुःशृंगी देवस्थान - चतुःशृंगी मंदिरात सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी व्यवस्थापक दिलीप अनगळ यांच्या हस्ते घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोना नियमांचे पालन करून सकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे.

हेही वाचा: बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले

मंगलमय वातावरणात प्रार्थनास्थळे खुली

सनई-चौघड्यांचे वादन, आकर्षक रांगोळी, फुलांच्या माळांनी सजलेली प्रवेशद्वारे आणि भाविकांच्या उपस्थितीत शहरातील मंदिरांचे गर्भगृह, मस्जिदींची आवारे, गुरुद्वारांचे लंगर आणि चर्चची सभागृहे सर्वांसाठी खुली झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल साडेसहा महिने म्हणजे मार्च २०२१ पासून बंद असलेली सर्व प्रार्थनास्थळे गुरुवारी अखेर सुरू झाली.

औंध येथील अय्यपा मंदिर समितीचे अध्यक्ष राजेश नायर म्हणाले, ‘आजवर गर्भगृहातच पुजाऱ्याच्या उपस्थितीत स्वामींची पूजा अर्चना होत होती. पण आता सर्व भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे. आम्ही कोरोनाचे नियम पाळत, फक्त एकाच व्यक्तीला मंदिरात प्रवेश देतो. ज्यांना पूजा करायची आहे, अशांनाच गर्भगृहापर्यंत जाण्याची मुभा दिली आहे.’

लष्कर परिसरातील कुरेशी मस्जिदचे अंजुम इनामदार म्हणाले, की पहाटे पाच वाजता सर्वांनी या निर्णयाचा आनंद व्यक्त करत नमाज पठण केले. शारिरिक अंतराचे पालन करत भाविकांनी आज मस्जितीत नमाज अदा केली.

सर्वच प्रार्थनास्थळांवर संबंधित प्रशासनाने सॅनिटायझर, शारिरिक अंतराचे पालन, मास्कची अनिवार्यता आदी नियमांची काळजी घेतली जात आहे. मात्र, काही भाविक अशा नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचेही प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भाविकांनी कोरोनाचे नियम पाळत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सरकारने मंदिरे खुली केली याचा आनंद होत आहे. शारीरिक अंतराचे पालन करत भाविकांच्या उपस्थितीत आज देवीची पूजा-अर्चना करण्यात आली. कोरोनातील संकटातून सर्वांना वाचव अशी प्रार्थनाही आज करण्यात आली.

- अनुप दत्ता, महासचिव, पुणे कालिबावडी मंदिर

loading image
go to top