पुणे : इतिहास लेखनात बाबासाहेब पुरंदरेकडून शिवाजी महाराजांवर अन्याय; शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune NCP President Sharad Pawar Criticism Babasaheb Purandare

पुणे : इतिहास लेखनात बाबासाहेब पुरंदरेकडून शिवाजी महाराजांवर अन्याय; शरद पवार

पुणे : दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास लेखनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. पुरंदरे यांनी त्यांच्या लेखनात महाराजांवर जेवढा अन्याय केला आहे, तेवढा अन्याय अन्य कोणत्याही लेखकाने केला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना केला. नव्या पिढीतील इतिहास तज्ज्ञांनी आणि अभ्यासकांनी सखोल संशोधन आणि अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास समाजासमोर आणण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी पवार यांच्या हस्ते पुण्यात झाले. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शाहू महाराज हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, कोकाटे यांचे विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवीचे मार्गदर्शक डॉ. पी. डी. जगताप, चंद्रशेखर शिखरे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, " दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि वास्तववादी इतिहास लिहिला नाही. त्यांनी त्यांच्या लेखनात शिवाजी महाराजांवर कायम अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी नवीन पिढीतील इतिहास तज्ज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे.

"दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हते"

राज्य सरकारने मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु या नात्याने दादोजी कोंडदेव यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला होता. पण त्यावेळी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते का, याचा शोध घेण्यासाठी एक समिती नियुक्त केली होती. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हतेच. त्यांचे खरे गुरु हे राजमाता जिजाऊ याच आहेत. तसेच शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचाही दुरान्वये संबंध नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Pune Ncp President Sharad Pawar Criticism Babasaheb Purandare Shivaji Maharaj History Writing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top