पुण्याच्या महापौरपदी मोहोळ उपमहापौरपदी शेंडगे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 November 2019

पुण्याच्या महापौरपदाची माळ नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात पडणार असून, या पदासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. उपमहापौरपदही आपल्याकडे ठेवत, त्याकरिता नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना संधी दिली आहे.

पुणे - पुण्याच्या महापौरपदाची माळ नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात पडणार असून, या पदासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. उपमहापौरपदही आपल्याकडे ठेवत, त्याकरिता नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना संधी दिली आहे. भाजपविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीने आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र, भाजपकडे स्वबळ असल्याने मोहोळ यांच्या निवडीची औपचारिकता राहिली आहे. या दोन्ही पदांसाठी येत्या शुक्रवारी (ता. 22) निवडणूक होईल. या दोघांसह आघाडीतर्फे नगरसेवक प्रकाश कदम आणि चांदबी नदाफ यांनीही अर्ज दाखला केला. 

महापौर- उपमहापौरपदांची मुदत येत्या गुरुवारी (ता. 21) संपत असल्याने या दोन्ही पदांसाठी निवडणूक होत आहे. महापौरपद मिळविण्यासाठी भाजपमधील अनेक ज्येष्ठ नगरसेवक प्रयत्नशील होते. मात्र, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सत्तेत आल्यानंतर "आरपीआय'ला दिलेल्या उपमहापौरपदावरही आता भाजपच्या शेंडगे राहतील. भाजपमधील राजकीय घडामोडीनंतर नाराजी उफाळून येण्याच्या शक्‍यतेने पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, खासदार संजय काकडे यांनी महापालिकेत धाव घेत, सकाळी नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत काही नगरसेवकांची समजूत काढण्याच्या दृष्टीने भूमिका मांडली. 

कोथरूडला पहिल्यांदाच महापौरपद 
महापौरपदासाठी मोहोळ यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती, त्यामुळे हे पद कोणाकडे जाणार, याची उत्सुकता होती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतून मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत कोथरूडमधून मोहोळ यांच्याऐवजी पाटील यांना तिकीट मिळाले होते, त्यामुळे मोहोळ यांना महापौरपदाची संधी मिळाल्याचे सांगण्यात आले. मोहोळ यांच्यानिमित्ताने कोथरूडला पहिल्यांदाच महापौरपद मिळाले आहे. मोहोळ हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून, स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. 

पद अडीच वर्षांसाठीच 
महापौर, उपमहापौरपदांसाठी इच्छुकांची गर्दी पाहता ही पदे एका वर्षासाठी असतील, असे काकडे यांनी जाहीर केले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे मिसाळ यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच, नाराज होऊ नका प्रत्येकाला संधी दिली जाणार असल्याचे सांगत मिसाळ आणि काकडे यांनी बैठकीत नगरसेवकांची समजूत काढली. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन महापौरपद हे अडीच वर्षांसाठीच राहणार असल्याचेही पुन्हा स्पष्ट करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune New Mayor Murlidhar Mohol and Deputy Mayor Saraswati Shandge