'दशक्रिया' चित्रपटाला ब्राह्मण महासंघाचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 November 2017

राज्य सरकारच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि लेखक बाबा भांड यांच्या "दशक्रिया' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले असून, यात अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अभिनयाबद्दल जोशी यांना "राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला.

पुणे : "पद्मावती' चित्रपटाबाबतचा वाद सर्वत्र चर्चेत असतानाच आता "दशक्रिया' या तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेल्या मराठी चित्रपटाला पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शवला आहे. या चित्रपटात ब्राह्मणांची व हिंदू प्रथा-परंपरांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने मंगळवारी केली. 

राज्य सरकारच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि लेखक बाबा भांड यांच्या "दशक्रिया' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले असून, यात अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील अभिनयाबद्दल जोशी यांना "राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला. शिवाय, उत्कृष्ट पटकथेचा आणि उत्कृष्ट चित्रपटाचाही पुरस्कार "दशक्रिया'ने मिळवला आहे. 

हिंदू धर्मातील दशक्रिया विधीची परंपरा व त्या अनुषंगाने अनेक जुनाट बाबींवर या चित्रपटातून परखड भाष्य करण्यात आले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे या वादाला सुरवात झाली आहे. दरम्यान, ब्राह्मण महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट जातिद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये, अशी मागणी महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, पदाधिकारी ऋषिकेश सुमंत, समर्थ फणसळकर, महिला आघाडीच्या सदस्या यांच्यासह काही पुरोहितांनी पोलिस आयुक्‍तालयातील विशेष शाखेचे सहायक आयुक्त यांना मंगळवारी निवेदन दिले. तसेच, हा चित्रपट प्रदर्शित करू नये, याबाबत सर्व चित्रपटगृहांच्या मालकांना महासंघाच्या वतीने बुधवारी पत्र देणार असल्याचे दवे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune news Brahman community oppose Dashkariya Movie