इंधनगळती, शॉर्टसर्किटमुळे वाहनांना आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

पुणे - टाकीतून इंधनाची होणारी गळती, इंजिनच्या वायरिंगमधील शॉटसर्किट आणि वाढते तापमान यामुळे वाहने पेट घेण्याच्या घटना वाढत असल्याचे निरीक्षण ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत वाहनांनी पेट घेण्याच्या सुमारे २५ घटना घडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. नगर रस्त्यावर विमाननगरजवळ गुरुवारी सकाळी पीएमपीच्या एका बसने पेट घेतला. त्यात चालकाची केबिन, इंजिनचा काही भाग जळून खाक झाला. सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या बाबतीतही आगीच्या घडत आहेत.

पुणे - टाकीतून इंधनाची होणारी गळती, इंजिनच्या वायरिंगमधील शॉटसर्किट आणि वाढते तापमान यामुळे वाहने पेट घेण्याच्या घटना वाढत असल्याचे निरीक्षण ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांत वाहनांनी पेट घेण्याच्या सुमारे २५ घटना घडल्याची नोंद अग्निशामक दलाकडे आहे. नगर रस्त्यावर विमाननगरजवळ गुरुवारी सकाळी पीएमपीच्या एका बसने पेट घेतला. त्यात चालकाची केबिन, इंजिनचा काही भाग जळून खाक झाला. सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या बाबतीतही आगीच्या घडत आहेत.

नेमके काय घडते? 
बस किंवा ट्रकसारख्या मोठ्या वाहनांच्या टाकीतून पाइपद्वारे इंधन इंजिनपर्यंत पोचविले जाते. या पाइपमधून काही वेळा इंधनाची गळती होते. त्यामुळे त्याची वाफ होते. इंजिनमधील वायरिंगच्या संपर्कात ही वाफ येते. वायरिंगमध्ये शॉटसर्किट असल्यास वाढत्या तापमानामुळे आग लागते. त्यामुळे वाहने पेट घेतात. त्यास प्रामुख्याने इंधनाचे गळके पाइप कारणीभूत असतात, असे निरीक्षण ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ प्रदीप सिन्नरकर यांनी नोंदविले. 

कोणती काळजी घ्यायला पाहिजे? 
पाइपमधून इंधन गळत नाही ना, याची नियमितपणे खातरजमा करायला हवी. तसेच टाकीत इंधन पुरेपूर भरू नका. टाकीचे झाकण घट्ट बसवा. इंजिनमधील वायरिंग पुरेसे सुरक्षित असेल, याची खातरजमा करून घ्या, असे आवाहन अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी केले आहे. 

ठेकेदारांना ४० कोटी दंड 
पीएमपीच्या भाडेतत्त्वावरील ६५३ पैकी किमान ६०० बस नियमितपणे मार्गांवर धावणे आवश्‍यक आहे; परंतु ठेकेदारांच्या ४००-४२५ बस मार्गांवर आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. या सर्व बस नव्या आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती योग्य पद्धतीने झाल्यास जास्तीत जास्त बस रस्त्यावर येऊ शकतात. त्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच कराराप्रमाणे बस रस्त्यावर न आल्यामुळे त्यांना सुमारे ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. 

बसच्या ठेकेदाराला नोटीस 
पाच ठेकेदारांकडून पीएमपीने ६५३ बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. त्यातील सध्या सुमारे ४२५ बस मार्गावर धावतात. या सर्व बस प्रामुख्याने बीआरटी मार्गावर धावतात. नगर रस्त्यावर पेट घेतलेली बस नवी असून, तीन वर्षांपासून वापरात आहे. इंजिनच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉटसर्किटमुळे बसने पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज पीएमपी वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक टी. एस. माने यांनी वर्तविला. संबंधित बस बीव्हीजी कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतलेली आहे. बसने कशामुळे पेट घेतला, याचे नेमके कारण शोधून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सांगण्यात आले आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. 

नगर रस्त्यावर ‘इन ऑर्बिट’ समोर घटना
वडगाव शेरी - नगर रस्ता बीआरटी मार्गावर ‘इन ऑर्बिट’ मॉलसमोरील बसथांब्याजवळ पीएमपीएलची बस (एमएच १४, सीडब्ल्यू १९८०) जळून खाक झाली. अग्निशामक दलाने ही आग अर्ध्या तासात आटोक्‍यात आणली. ही घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

ही बस निगडीवरून वाघोलीकडे जात होती. विमाननगर चौक ओलांडल्यावर ‘इन ऑर्बिट’समोरील बीआरटी थांब्यावर आल्यावर पुढील भागातून अचानक धूर येऊ लागला. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांब्यापासून पुढे घेतली. या वेळी बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते. प्रवासी तत्काळ बसमधून बाहेर पडले. त्यानंतर लगेच बसने पेट घेतला. ही आग पसरून संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडली. रस्त्यावर जळणारी बस पाहून नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती कळविल्यानंतर साडेदहाच्या सुमारास बंब दाखल झाला. जवानांनी पंधरा मिनिटांत आग आटोक्‍यात आणली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news the burning bus fuel leakage short circuit fire