मुलांनी उभारला भावविश्‍वाचा ‘कॅनव्हास’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 डिसेंबर 2017

पुणे - हिरव्यागार जंगलावर उभी राहिलेली सिमेंट- काँक्रीटची जंगले, स्पर्धेमुळे बिघडलेले आरोग्य, बदलणाऱ्या ऋतुमानांचा वेध घेतानाच व्यसने, ब्लू व्हेल गेम, मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम... आणि माणसापासून खूप दूर गेलेली निसर्गसृष्टी आणि त्यातील प्राणी... अशा असंख्य गोष्टी विद्यार्थ्यांनी हृदयात साठविल्या. त्या घटना, कल्पनांना जगासमोर आणण्यासाठीचा अखेर तो दिवस उजाडला अन्‌ त्याच कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलाकृतींद्वारे जगासमोर मांडल्या. नाजूक बोटांनी रंग-रेषांची मुक्तपणे उधळण करत आपल्या भावविश्‍वाचा खरा ‘कॅनव्हास’ त्यांनी उभा केला. निमित्त होते, सकाळ चित्रकला स्पर्धेचे!

पुणे - हिरव्यागार जंगलावर उभी राहिलेली सिमेंट- काँक्रीटची जंगले, स्पर्धेमुळे बिघडलेले आरोग्य, बदलणाऱ्या ऋतुमानांचा वेध घेतानाच व्यसने, ब्लू व्हेल गेम, मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम... आणि माणसापासून खूप दूर गेलेली निसर्गसृष्टी आणि त्यातील प्राणी... अशा असंख्य गोष्टी विद्यार्थ्यांनी हृदयात साठविल्या. त्या घटना, कल्पनांना जगासमोर आणण्यासाठीचा अखेर तो दिवस उजाडला अन्‌ त्याच कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलाकृतींद्वारे जगासमोर मांडल्या. नाजूक बोटांनी रंग-रेषांची मुक्तपणे उधळण करत आपल्या भावविश्‍वाचा खरा ‘कॅनव्हास’ त्यांनी उभा केला. निमित्त होते, सकाळ चित्रकला स्पर्धेचे!

‘चित्र रेखाटा, रंग भरा, कल्पनेच्या पंखांनी उंच भरारी घ्या’, असे सांगत विद्यार्थ्यांना रंग-रेषांच्या अनोख्या दुनियेची दारे खुली करून देणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’ला जाण्याच्या उत्साही वातावरणानेच रविवारची सकाळ उजाडली. शहराच्या मध्यवर्ती भागासह डेक्कन, कोथरूड, एरंडवणे, मुंढवा, हडपसर, घोरपडी गाव, भवानी पेठ, खराडी, कोंढवा, लोहगाव, कॅम्प, वडगाव शेरी, वानवडी, वाघोली, येरवडा या उपनगरांमधील केंद्रांवर आपल्या मुलांना घेऊन पालकांची गर्दी होऊ लागली. साडेआठ वाजता या गर्दीने उच्चांक गाठला. ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’मध्ये सहभागी झालेल्या पाल्यांना ‘चांगले चित्र काढायचं हं’, असे सांगण्यापासून ते ‘तुझं चित्र सगळ्यांशी बोललं पाहिजे बरं का?’, अशा शब्दांनी प्रोत्साहित करण्याचे काम पालकांनी केले.

यंदाच्या स्पर्धेस ‘पॉवर्ड बाय लव्ह इट चॉकलेट्‌स’ आणि ‘एलआयसी’ असून, श्री चैतन्य टेक्‍नो स्कूल आणि जिंगल टून्स सहप्रायोजक, भारताचे अग्रगण्य ऑप्टिशियन्स गंगर आयनेशन आयकेअर पार्टनर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण पार्टनर, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर आहेत. ग्लोबल कन्झुमर प्रॉडक्‍ट्‌स या प्रायोजक कंपनीने पुणे, पिंपरी- चिंचवड, निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘लव्ह इट’ चॉकलेटचे वाटप केले. आपल्या आवडीचे चित्र काढण्याची मिळालेली संधी आणि त्याजोडीला आवडीचे चॉकलेट मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

सकाळी नऊ वाजता पाचवी ते दहावीच्या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी शहराच्या विविध भागांतील केंद्रांवर स्पर्धा सुरू झाली. शाळेत नावनोंदणी करण्यास विसरलेल्या विद्यार्थ्यांनाही स्पर्धेत सहभाग घेऊ दिल्याने त्यांच्यासह पालकांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. आपापल्या स्कूलबॅगमधील कंपास पेटी, पेन्सिल, रंगांच्या बाटल्या, रंगकांड्यांपासून विविधरंगी पेन केव्हाच बाहेर पडले. कधी पट्टीच्या साहाय्याने, तर कधी नाजूक बोटे हळुवार फिरवीत कोऱ्या कागदावर रेषा उमटू लागल्या. उंच उंच डोंगर, त्यातून डोकावणारा सूर्य, नदीचे झुळूझुळू वाहणारे पाणी, त्याभोवती हिरवागार निसर्ग, या निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्‍तपणे विहार करणारे प्राणी अन्‌ पक्षी... अशा स्वरूपात निसर्गाचे विविधरंगी रूप चित्रांमधून उलगडत गेले. तर कुठे दारूमुळे उद्‌ध्वस्त होणारे आयुष्य, बदलत्या जीवनशैलीमुळे कमकुवत झालेल्या हृदयापासून ते सिमेंटच्या जंगलापर्यंतचे वास्तव विद्यार्थ्यांनी चित्रांद्वारे मांडले. सर्वसामान्य मुलांसह दिव्यांग व विशेष मुला-मुलींनीही स्पर्धेत सहभाग घेत आकर्षक चित्रे रेखाटली.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपंख
आपल्या डोळ्यांनी आत्तापर्यंत टिपलेला सभोवताल विद्यार्थ्यांनी चित्रांसाठी दिलेल्या विषयांमध्ये बसविण्यासाठी कसून प्रयत्न केला. आपल्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला विषय समजून सांगण्यापासून ते ‘दोस्ती’मध्ये थोडी मदत करण्याचा, एकमेकांच्या रंगसाहित्याची देवाण- घेवाण करण्याचा आनंदही लुटला. रेषांच्या दुनियेतून काहीसे बाहेर येत विद्यार्थी पुन्हा रंगांच्या दुनियेत हरवले. स्पर्धेची वेळ संपत असतानाच त्या नाजूक बोटांमध्ये वीज संचारली. कधी रेषा, तर कधी रंगांची मुक्त उधळण करत विद्यार्थ्यांनी आपले चित्र अधिकाधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न केला. अखेर ‘ती’ चित्रकलाकृती पूर्ण झाली आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपंख हळुवारपणे फिरत गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news chitrakala spardha