कचऱ्यातून फुलवली बाग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

बागकामाची आवड असल्यामुळे घरातील मोकळ्या जागी बाग फुलवावी, या उद्देशाने त्या कामाला लागल्या; पण एवढ्या मोठ्या जागेतील झाडांसाठी खत विकत घेण्यापेक्षा घरातील ओला कचरा आणि पालापाचोळा घरातच जिरवून खतनिर्मिती करण्याची कल्पना सीमा आगलावे यांना सुचली अन्‌ त्यासाठी त्यांनी कामही सुरू केले. घरातला कचरा घरातच जिरवल्यामुळे आज त्यांना मोठ्या प्रमाणात गांडूळ आणि कंपोस्टखत मिळत असून, याच खतामुळे आज त्यांची बाग फुलली. 

बागकामाची आवड असल्यामुळे घरातील मोकळ्या जागी बाग फुलवावी, या उद्देशाने त्या कामाला लागल्या; पण एवढ्या मोठ्या जागेतील झाडांसाठी खत विकत घेण्यापेक्षा घरातील ओला कचरा आणि पालापाचोळा घरातच जिरवून खतनिर्मिती करण्याची कल्पना सीमा आगलावे यांना सुचली अन्‌ त्यासाठी त्यांनी कामही सुरू केले. घरातला कचरा घरातच जिरवल्यामुळे आज त्यांना मोठ्या प्रमाणात गांडूळ आणि कंपोस्टखत मिळत असून, याच खतामुळे आज त्यांची बाग फुलली. 

निवृत्त शिक्षिका सीमा आगलावे आणि त्यांचे पती ॲड. एच. एस. आगलावे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या या प्रयोगामुळे त्यांच्या घरातील बाग सुंदर झाडांनी मोहरली आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून आगलावे कुटुंबीयांनी फुलवलेली ही बाग पाहण्यासारखी आहे. 

झाडांचा पालापाचोळा असो वा स्वयंपाक घरातला ओला कचरा यावर प्रक्रिया करून त्यातून खतनिर्मिती करण्याची किमया आगलावे कुटुंबीयांनी केली आहे. यात सर्वांत मोठा वाटा आहे तो सीमा यांचा. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणारे हे कुटुंब प्रत्येकासाठी आदर्श असेच म्हणावे लागेल. याबाबत सीमा म्हणाल्या, ‘‘मला बागकामाची आवड आहे. त्यामुळे मी अनेक वर्षांपासून घरातील कचऱ्यातून गांडूळ आणि कंपोस्टखताची निर्मिती करत आहे. ज्यांच्या अंगणात पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्यांनी घरातला कचरा घरात जिरवून खतनिर्मिती करावी. यातून घरात झाडे लावता येतील. तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनही होते आणि त्याचा आपल्याला बागेसाठी उपयोगही होतो. पावसाचे साठलेले पाणी (रेन वॉटर हार्वेस्टिंग) आम्ही बागेतील झाडांसाठी वापरतो, अशा विविध प्रयोगांमुळे घरातील बाग फुलली आहे.’’ 

आगलावे कुटुंबीयांच्या या बागेत नारळ, जांभूळ, आंबा, डाळिंब ही झाडे आहेत. त्याशिवाय जास्वंद, झेंडू, मोगरा, चाफा, सोनचाफा, रातराणी अशी फुलेही आहेत. पालक, अळू, भेंडी, वांगी ही भाज्यांची आणि कडुनिंब, बेल अशी झाडेही आहेत.

पालापाचोळ्यातून खतनिर्मिती
६९ वर्षीय सीमा आगलावे यांनी अंगणात ५ फुटांचे दोन खड्डे तयार करून घेतले. त्यात त्यांच्या बागेतील झाडांचा पालापाचोळा गोळा करण्यास त्यांनी सुरवात केली. गोळा झालेल्या पालापाचोळ्यातून त्यांना दर तीन महिन्यांनी गांडूळ आणि कंपोस्टखत मिळत आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे वर्षभरात ८ ते १० पोती खत झाडांसाठी मिळत आहे. हे खत त्या बागेतील झाडांसाठी वापरत आहेत. 

ओल्या कचऱ्यातूनही खत
सीमा या स्वयंपाक घरातील ओला कचरा साठवून तो अंगणात ठेवलेल्या बादल्यांमध्ये टाकून त्यात सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारी पावडर टाकतात. त्यातून त्यांना दर तीन महिन्यांनी खत मिळत आहे. या खताचा उपयोगही त्या झाडांसाठी करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Flushed garden from the trash