Pune News : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

Pune News : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

जुन्नर : पोलीस असल्याचे भासवून जुन्नर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन भामट्यानी लंपास केले.

ही घटना जुन्नर येथील बोडकेनगर परिसरात बुधवार ता.२३ रोजी दुपारी घडली. गुरुवार ता.२४ रोजी याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली.

रामदास सखाराम ताजणे वय ७१ रा. बोडकेनगर जुन्नर हे रस्त्याने पायी घरी जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. पोलीस असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. ताजणे यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन व बोटातील सहा ग्रॅम सोन्याची अंगठी त्यांना काढून रुमालात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. यावेळी भामट्यानी हातचलाखीने सोन्याच्या वस्तू काढून घेतल्या व पोबारा केला. पोलीसांनी ताजणे यांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार भोजने करत आहेत.