नकोशी झाली हवीशी 

किरण जोशी
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पिंकी.. मध्यमवर्गीय कुटुंबातील लाघवी अन्‌ सालस मुलगी. तिसरीत शिकणारी पिंकी पाटीवर काहीतरी चित्र काढण्यात मग्न झाली होती. ‘काय गं पिंकी, कशात गढून गेलेस..’ स्वयंपाक घरातून बाहेर आलेल्या आईनं साडीला हात पुसत विचारलं. पिंकीनं पाटीवर आई-बाबांचं चित्र काढलं होतं. शेजारी कौलारू घर आणि त्याच्या बाजूला लिहिलं होतं; माझं छोटंस घर आणि लाडके आई-बाबा! आईला खूप कुतूहल वाटलं. तेवढ्यात स्कूटरचा आवाज आला. कावरीबावरी झालेल्या पिंकीनं वह्या-पुस्तकं पटापट दप्तरात भरण्यास सुरवात केली. घरात पाऊल टाकताच बाबांनी ते पाहिलं आणि ते संतापले. ‘मी मेल्यावरच तुला अक्कल येणारेय का?

पिंकी.. मध्यमवर्गीय कुटुंबातील लाघवी अन्‌ सालस मुलगी. तिसरीत शिकणारी पिंकी पाटीवर काहीतरी चित्र काढण्यात मग्न झाली होती. ‘काय गं पिंकी, कशात गढून गेलेस..’ स्वयंपाक घरातून बाहेर आलेल्या आईनं साडीला हात पुसत विचारलं. पिंकीनं पाटीवर आई-बाबांचं चित्र काढलं होतं. शेजारी कौलारू घर आणि त्याच्या बाजूला लिहिलं होतं; माझं छोटंस घर आणि लाडके आई-बाबा! आईला खूप कुतूहल वाटलं. तेवढ्यात स्कूटरचा आवाज आला. कावरीबावरी झालेल्या पिंकीनं वह्या-पुस्तकं पटापट दप्तरात भरण्यास सुरवात केली. घरात पाऊल टाकताच बाबांनी ते पाहिलं आणि ते संतापले. ‘मी मेल्यावरच तुला अक्कल येणारेय का? किती वेळा सांगितलंय पिंकीला थोडं घरकाम शिकवं म्हणून... शिकून कुठं दिवे लावणारेय ती.., ए पिंके बंद कर ते आधी..! आईकडं रागानं बघत  बाबा खेकसले.  

हिरमुसलेल्या पिंकीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. दप्तरात पुस्तकं ठेवण्याची घाई करून ती भांडी घासण्यासाठी अंग चोरून निघून गेली. 

हात- पाय धुऊन तोंड पुसत बाबांनी विचालं, ‘अगं ए, बंड्या कुठं गेलाय...’ ‘दुपारपासूनच गेलाय हुंदडायला...’ त्रासलेल्या स्वरातच आईनं उत्तर दिलं. ‘अगं जाऊ दे, जाऊ दे... खेळायचंच वय आहे त्याचं... आत्ता नाही खेळणार तर कधी खेळणार!’

तेवढ्यात बंड्या पळत पळत आला. ‘बाबा... बाबा.....’ जेवत असलेल्या बाबांच्या मांडीवर लोळण घेत म्हणाला, ‘आमच्या शाळेची परवा ट्रिप जाणार आहे महाबळेश्‍वरला; मलाही जायचंय... १ हजार रुपये भरायचेत!’ ‘बापरे, हजार रुपये; बरं बरं, जा. मला नाही मिळालं फिरायला, निदान तू तरी फिर..’ असं म्हणताना बाबांचा चेहरा खुलला. 

दोन दिवसांनी बंड्याला सहलीसाठी सोडण्यासाठी म्हणून आई सकाळी लवकरच घराबाहेर पडली. पिंकीनं बाबांना डबा भरून दिला. स्कूटरला किक मारून ते कामावर निघून गेल्याची खात्री झाल्यावर पिंकीनं शाळेत जाण्यासाठी तयारी सुरू केली. घराला कुलूप लावून मैत्रिणींसमवेत ती जाऊ लागली. थोडे पुढे गेल्यावर तिला चौकात गर्दी दिसली. काहीतरी झाल्याचे पाहून पिंकी मैत्रिणींसमवेत गर्दीतून पुढे गेली. पाहते तर काय, रक्तबंबाळ अवस्थेत तिचे बाबच पडले होते. त्यांचा ॲक्‍सिडेंड झाला होता. पाठीवरील दप्तर फेकून ती धावली. त्यांचं डोकं मांडीवर घेत रडू लागली. कारनं ठोकरल्याचं गर्दीतील लोकांनी तिला सांगितलं. बरंच खरचटलं होतं, पायातून रक्त येत होतं. लोकांच्या मदतीनं तिनं बाबांना रिक्षात बसवलं आणि दवाखान्यात घेऊन गेली; पण तिथं डॉक्‍टर नव्हते. उपचार करण्यासाठीही कोणीच नव्हतं. तिनं बाबांना पाणी दिलं. ते वेदनेनं विव्हळत होते. ‘बाबा, काळजी करू नका, डॉक्‍टर येतील आणि तुम्ही लगेच बरं व्हाल...’ आतून घाबरलेली पिंकी त्यांना मात्र धीर देत होती. काय करावं तिला सुचत नव्हतं. देवाचं नाव घेत असतानाच शिक्षकांनी शिकवलेलं काहीतरी आठवलं अन्‌ ती धावत सुटली. येताना तिच्या हातात काहीतरी वस्तू होत्या. बाबांच्या पायाच्या जखमेवर तिनं हळूवार पाणी सोडलं. कापसानं जखम स्वच्छ केली. शेजारच्या हॉटेलमधून आणलेली हळद जखमेला लावली. शिक्षकांनी सांगितल्या प्रमाणं पायाच्या दोन्ही बाजूंना लाकडाची पट्टी ठेवून कापड गुंडाळलं. थोड्या वेळानं डॉक्‍टर आले. पायाला बांधलेल्या पट्ट्या पाहून त्यांना कुतूहल वाटलं. त्यांनी विचारलं, ‘हा प्रथमोपचार कुणी केला?’ बाबांनी पिंकीकडं बघितलं. तिच्या डोक्‍यावरून हात फिरवत डॉक्‍टर म्हणाले, ‘व्हेरी नाइस, गुड गर्ल..’ डॉक्‍टरांनी उपचार केले, औषध-गोळ्या दिल्या आणि बाबांना घरी जाण्यास सांगितलं. पिंकी आणि बाबा रिक्षातून घरी आले. 

बाबांना थोडं बर वाटावं म्हणून जखम झालेल्या पायावरून ती हळूवार हात फिरवू लागली. भावनावश झालेले बाबा ढसाढसा रडू लागले. त्यांनी पिंकीला जवळ ओढलं अन्‌ गळ्याशी घट्ट लावलं. ‘बाळा, माझी चूक झाली, मला माफ कर.. दुसऱ्या दिवशी ते पिंकीला घेऊन लंगडत-लंगडतच बाहेर पडले; रस्त्यावरून चालत चालत अपघात झालेल्या ठिकाणी आले, तिचं दप्तर बाजूलाच पडलं होतं, ते उचलून त्यावरील धूळ झटकली. तिच्या पाठीला दप्तर लावलं आणि तिचं बोट धरून त्यांनी शाळेची वाट धरली.... एका बापानं लेकीच्या जन्माचं आज खऱ्या अर्थाने स्वागत केलं होतं...!

Web Title: pune news girl