महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 August 2017

बैठकीतील अपेक्षा
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबतचे खटले मोफत चालविले जावेत.
महिलांविषयक विविध प्रश्‍नांवर काम करण्यासाठी ‘स्वतंत्र गट’ स्थापन व्हावा
गर्भवती महिलांची सुरवातीपासूनच अधिकृत नोंद व्हावी
लहान मुलींसाठी ‘स्वतंत्र हेल्पलाइन’ कार्यान्वित करावी
मुलीचा जन्म झाल्यास प्रसूती खर्च माफ करावा किंवा सवलत द्यावी

लोक एकत्र आले आणि समस्या सुटली किंवा सुटण्यास मदत झाली, अशी प्रेरणा देणारी काही उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. असेच आणखी एक उदाहरण तयार होत होते... ते म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी महिलांनी एकत्र येऊन ‘परिवर्तनाच्या दूत’ बनण्याचा घेतलेला निर्णय. ‘नकुशी नव्हे; हवीशी’ हा उपक्रम हातात घेऊन ‘सकाळ’ने वेगवेगळ्या स्तरातील महिलांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शंभरहून अधिक जण उपस्थित होते. समाजाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन ‘नकुशी’ कशी ‘हवीशी’ ठरेल, याबाबत जनजागृती करण्याचा निर्धार करत महिलांनी समूह परिवर्तनाच्या दिशेने नवे पाऊल टाकले. 

शहर असेल किंवा गाव, सोसायट्या असतील किंवा वाड्या-वस्तीचा भाग, उच्चशिक्षित लोक असतील किंवा अशिक्षित या सर्वांपर्यंत जाऊन आपल्याला ‘मुलीच्या जन्माचे स्वागत व्हायला हवे’, हा विचार पोचवायला हवा. निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीने प्रचार केला जातो त्यापद्धतीने हा ‘प्रचार’ व्हायला हवा. त्यासाठी ‘परिवर्तनाच्या दूत’ म्हणून आपण पुढे यायला हवे. स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्त्री-पुरुषांना बरोबरीचे स्थान येण्यासाठीसुद्धा हे गरजेचे आहे.
- आमदार मेधा कुलकर्णी 

लोकप्रतिनिधी, डॉक्‍टर, स्वयंसेवक अशा सर्वांचे एकत्रित गट करायला हवेत. या गटांमार्फत ‘मुलींच्या जन्माचे स्वागत’, ‘लेक वाचवा’ हे विषय हाताळायला हवेत. या विषयातील समस्यांवर एकत्रित येऊन उपाय शोधायला हवेत. मुलींचा खर्च पेलवत नाही, ही मानसिकता बदलायला हवी. मुलगा-मुलगी समान आहेत, हे संस्कार घरातूनच रुजविले पाहिजेत.
- कमल व्यवहारे

स्त्री ही वस्तू आहे. तिच्यावर आपली मालकी आहे, असे संस्कार मुलांवर होणार नाहीत, हे पालकांनी पाहायला हवे. मुलगा-मुलगी असे भेदभाव घरात होऊ नये. घरातील वातावरणाचा मुलांच्या विचारांवर परिणाम होतो. त्यामुळे घराघरांत जागृतीची आवश्‍यकता आहे.
- ॲड. गायत्री खडके-सूर्यवंशी 

आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे काही कुटुंबांत मुली नकोशा असतात. त्यासाठी कुटुंबात फक्त मुलाला महत्त्व न देता मुलीलाही समान वागणूक द्यायला हवी. आजी, आई, बहीण, बायको आदी नात्यांकडे सन्मानानेच बघितले पाहिजे, हे संस्कार आणि शिक्षण कुटुंबातूनच द्यायला हवेत. स्त्रियांनीही मुलगाच हवा, असा हट्ट न करता स्त्री जन्माचे स्वागत करणे गरजेचे आहे. 
- स्वप्नाली सायकर

मुलगी नको, या मागे असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे आपल्याकडे कायद्याची अंमलबजावणी कडकपणे करणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांविषयीची विशिष्ट चौकट मोडण्यासाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा. स्त्री जन्माबद्दल आदराची भावना निर्माण करण्यासाठी शाळा- महाविद्यालयांमधूनही जागरूकता करणे गरजेचे आहे. 
- ज्योती कळमकर

स्त्रियांचा सन्मान वाढविण्यासाठी हा उपक्रम ‘सकाळ’ने हाती घेतल्याबद्दल कौतुक वाटते. या उपक्रमामुळे स्त्रियांबद्दलच्या आदरात नक्की वाढ होईल. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात असलेली तफावत दूर होईल. त्यासाठी समाजाची मानसिकता घडविण्याची गरज आहे. त्यातूनच मुलांइतकेच मुलींच्याही जन्माचे कौतुक होईल.
- नीलिमा खाडे

प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या यशाचे कौतुक करून ‘सकाळ’ने ‘नकुशी नको तर हवीशी’ हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मनापासून अभिनंदन करते. महापालिकेच्या माध्यमातून या या उपक्रमासाठी आवश्‍यक असलेले सर्व सहकार्य करण्यात येईल, याची ग्वाही मी देते. महिला कल्याणासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक योजनांची अंमलबजावणी येत्या काही महिन्यांत होणार आहे. 
- राणी भोसले

‘सकाळ’ने नकुशी नव्हे हवीशी हा उपक्रम सुरू केला याबद्दल त्यांचे आभार. अशा उपक्रमांची आज खरी गरज आहे. मुलीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून त्यासाठी समाजप्रबोधन झाले पाहिजे. खासकरून वस्ती पातळीवर याविषयी जनजागृती व्हावी. त्याचबरोबर मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
- मानसी देशपांडे

मुलींबद्दल समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘लेक लाडकी’ योजनेची लोकसहभागातून अंमलबजावणी करायला हवी. मुलींना केवळ प्राथमिक शिक्षण मोफत न देता उच्च शिक्षणासाठीही केंद्र आणि राज्य सरकारने मदत केली पाहिजे. स्त्री- पुरुष समानतेबद्दलचे संस्कार मुला- मुलींना शालेय जीवनापासूनच द्यायला हवेत.  
- अस्मिता शिंदे

आपल्या गर्भातील मुलीला जन्म देतानाच स्त्रीने समाजाला ठणकावून सांगितले पाहिजे की काहीही झाले तरी माझ्या गर्भातील कळी मी खुंटणार नाही, तिला जन्म देणारच. तरच खरी ‘नकुशी’ कमी होऊन ‘हव्याश्‍या’ जन्म घेतील आणि समाजाचा समतोल साधला जाईल. त्यासाठी आम्ही ‘तनिष्का’ म्हणूनही पुढाकार घेण्यास इच्छुक आहोत. 
- रूपाली चाकणकर

स्त्रियांबद्दल अजूनही समाजात काही प्रमाणात वेगळी भावना आहे. त्यामुळे समाजातील पुरुष प्रधान संस्कृतीची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. स्त्रियांना सन्मान आणि आदराची वागणूक मिळावी, यासाठी ‘नुकशी नको, हवी हवीशी’ हा ‘सकाळ’चा उपक्रम स्तुत्य आहे. महिला लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत भविष्यातही आम्ही त्यात सहभागी होणार आहोत. 
- नंदा लोणकर

स्त्री जन्माचे स्वागत व्हावे आणि महिलांना विविध क्षेत्रात संधी मिळावी यासाठी सर्व महिलांनी एकत्र यावे. आपापली जबाबदारी निश्‍चित करून जनजागृतीची व्यापक मोहीम हाती घ्यावी. तरच प्रश्‍न सोडवलेले पहिले शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाईल. पुणे ‘रोल मॉडेल’ ठरेल. या कामात ‘सकाळ’ आपल्या पाठबळ देईल.
- डॉ. सुनीता मोरे

मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर सरकारने त्यासाठी विशेष आरक्षण द्यायला हवे. मुलीचा जन्म झाल्यावर तिचा खर्च कसा करावा, हा प्रश्‍न पालकांना भेडसावत राहतो. पालकांनी तिच्या संगोपनासाठी एक विशेष रक्कम डिपॉझिट करावी. तसेच, सरकारी योजनांमध्ये मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा.
- अश्‍विनी शिंदे

वारसदार म्हणून मुलगाच हवा, हा अट्टहास अजूनही कायम आहे. तो बदलण्यासाठी शहर पातळीबरोबरच ग्रामीण भागात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन आपल्याला प्रयत्न करायला हवेत. हे प्रबोधन भाषणांऐवजी गप्पांमधून, चर्चेतून व्हायला हवे. याबरोबरच लघुपट, नाटक, पथनाट्य, कविता अशा माध्यमांचाही आपल्याला उपयोग करून घेता येईल.
- डॉ. संगीता बर्वे

मुख्य मुद्दा मानसिकतेचा आहे. तो बदलण्यासाठी समाज प्रबोधन, सामाजिक जागरूकता आणि व्यापक शिक्षणाची गरज आहे. याची सुरवात घरातूनच होणे जरुरीचे आहे. मुलींना वाढविण्याच्या आणि मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा. मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याकडे लक्ष केंद्रित करणे जरुरी आहे.
- डॉ. कल्याणी बोंद्रे

स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, याची जाणीव प्रथम व्हायला हवी. ही जाणीव झाली तर स्त्रीला कोणाच्याही आधाराची गरज नाही; पण समाजात स्त्री-पुरुष असे भेद आजही होतात. हे भेद थांबवणे आणि स्त्रियांना सक्षमतेची जाणीव करून देणे यासाठी वेगवेगळे गट स्थापन करून त्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला हवे.
- सुनीताराजे पवार

‘मुलगी नको’ ही ‘अंधश्रद्धा’ समाजात अजूनही आहे. ती घालवण्यासाठी वाड्या-वस्त्याच नव्हे, तर मोठमोठ्या सोसायट्यांमध्येसुद्धा आपल्याला जाऊन तेथे प्रबोधन करावे लागणार आहे. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचे लहान-लहान ग्रुप स्थापन व्हायला हवेत. ती परिवर्तनाची नवी सुरवात असेल.
- प्रतिभा मोडक

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. अबला म्हणून तिला हीन दर्जाची वागणूक मिळते. हे तर चित्र बदललेच पाहिजे. शिवाय, वेगवेगळ्या कारणांमुळे मुलगी नको म्हणण्याची प्रथा थांबली पाहिजे. यासाठी स्त्रीला सुरक्षा, स्थिरता मिळाली पाहिजे. तरच तिचे जीवन सुखमय होईल. मुलांइतकाच सन्मान मुलींनाही मिळायला हवा.
- हर्षा शहा

स्त्री जन्माचे स्वागत या विषयावरील प्रबोधनात्मक कार्यात अधिकाधिक स्त्रियांबरोबरच अधिकाधिक पुरुषांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे. प्रबोधनाची आवश्‍यकता स्त्रियांबरोबरच पुरुषांमध्येही आणि सर्व समाजात आहे. त्यामुळे व्यापक मोहीम आखायला हवी.
- रजिया बल्लारी

प्रत्येक मूल हा एक ‘जीव’ आहे, त्याचा आपण स्वीकार करायला हवा. हे आपण पटवून दिले तर ‘नकोशी’ ही हवीशी ठरण्यास मदत होईल. कायदा केला की त्यात पळवाटा शोधल्या जातात. त्यामुळे जागृतीचीच मोठी आवश्‍यकता आहे. स्त्री खंबीर, आपल्या पायावर उभं राहणारी बनायला हवी. त्यातूनही अनेक समस्या सुटतील.
- कल्याणी कलावंत

महिला आरक्षण मिळाले. आता संरक्षण मिळण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी प्रथम समुपदेशनाच्या माध्यमातून पुरुषी मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन गट स्थापन करायला हवेत. सोशल मीडियापासून प्रत्यक्ष गाठीभेटीच्या माध्यमातून प्रबोधनाची कामे हाती घ्यावे लागतील.
- सोनाली मारणे

महिलांच्या हक्कासाठी आणि मुलीला जगण्याचा हक्क मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवा. वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वयोगटातील महिलांनी नव्हे, तर पुरुषांनाही एकत्रित करून ‘विचार मंच’ स्थापन करायला हवा. या मंचामार्फत प्रबोधन करणे आवश्‍यक आहे.
- वैशाली पाटकर

महिलेला तिच्या घरातून आणि नातेवाइकांकडून त्रास दिला जातो. यामध्ये बदल होणे गरजेचे आहे. शाळा-शाळांमधून ‘स्त्री’चे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेबरोबरच ‘मेड फॉर इच अदर’ हे मुलांना समजावून सांगण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत.
- तिलोत्तमा रेड्डी

मुलगी हा कुटुंबाचा पाया आहे. घरात मुलगी नसेल तर आयुष्याला अर्थ नाही. मुलगी त्यांच्या कुटुंबासाठी किती आवश्‍यक आहे, हे आई-वडिलांनी समजून घेतले पाहिजे. मुलगी आपले कर्तव्य आणि जबाबदारी चोखपणे बजावते. म्हणूनच मुलीच्या जन्माचे आपण स्वागत केले पाहिजे. घरातील मुलांना मुलीच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी.
- हर्षदा फरांदे

मी वस्ती पातळीवर काम करते. येथे भेडसावणारा प्रमुख प्रश्‍न म्हणजे तरुणांमधील व्यसनाधीनता. यामुळे महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ होतो आणि ती गरोदर राहते. अशा वेळी तिला मुलगी झाली तर अतोनात छळ सहन करावा लागतो. यावर आपण उपाय केले पाहिजे. मुलगी झाल्याची भीती आईच्या मनातून काढण्यासाठी कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी. बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये मुलगी वाचवा, या विषयावर जनजागृती करावी.
- ॲड. वैशाली चांदणे

समाजात मुलीचा जन्म का नाकारला जातो, या कारणांचा आपण शोध घेतला पाहिजे. रूढी-परंपरेच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते थांबवण्याचा प्रयत्न व्हावा. त्यासाठी समाजातील संवेदना जागवण्यासह महिला आणि तरुणींचा सामाजिक उपक्रमात सहभाग वाढवायला हवा. गृहिणींच्या नावे बॅंकेत काही ठराविक रक्कम जमा केली जावी. जेणेकरून अडचणीच्या काळात तिला आधार मिळू शकेल.
- डॉ. पद्मश्री पाटील

महिला व तरुणींमध्ये त्यांच्यासाठीच्या सरकारी योजनांविषयी जागरूकता नाही. या योजना लालफितीत अडकलेल्या आहेत. त्यांच्यात कायद्यांबद्दल जागृती झाली पाहिजे. महिलांच्या प्रश्‍नांबाबत काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्था आहेत. त्यांच्यात समन्वय साधला जावा. महिला-तरुणींना आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर प्रोत्साहन द्यावे. महिलांना एकत्रित करून प्रबोधनपर कार्यक्रम राबवावे. 
-तेजस्वी सेवेकरी

मुलींचे महत्त्व अधोरेखित करण्यात पुणे महापालिका, महिला बालकल्याण विभाग, अंगणवाडी आदी संस्था-संघटनांनी आपल्या पातळीवर प्रयत्न करताना दिसतात. या सर्व घटकांनी एकत्र येऊन मुलगी वाचवाच्या चळवळीला बळ दिले पाहिजे. वैद्यकीय संघटनांनी अंतर्गत दबाव यंत्रणा तयार करून गर्भलिंग निदान करणाऱ्यांना शोधून काढणे गरजेचे आहेच, पण त्याचबरोबर लोकांनी मुलींचे दत्तक पालकत्वही स्वीकारावे.
-आनंद पवार

मुलगी जन्माला आली की महिलेलाच दोषी ठरवले जाते. वैज्ञानिक प्रगती होत असताना आपण आजही रूढी-परंपरेत अडकलेले आहोत. पतीवर अवंलबून न राहता महिलेने मुलगी जन्मली म्हणूनचा दोषारोप सहन न करता तर तिच्या पालकत्वाची जबाबदारी निर्भीडपणे स्वीकारावी. स्वतःच्या पायावर उभे राहून मुलीचे पालनपोषण करावे. 
- स्मिता जोशी

गणेशोत्सवात आणि नवरात्रामध्ये ‘लेक वाचवा, लेक जगवा’ याविषयावर भित्तिपत्रकाच्या माध्यमातून जनजागृती करावी. तसेच, मुलींच्या पालकांसाठी मार्गदर्शनपर शिबिरे घ्यावीत. स्त्रीरोगतज्ज्ञांना या अभियानात सहभागी करून घ्यावे. रुग्णालयातील प्रसूतिगृहात सरकारी योजनांची माहिती देणारी फलके लावावीत. रुग्णालयाने मुलीच्या जन्मावर कुटुंबीयांकडून कमीत कमी शुल्क आकारावे.
- विभावरी कांबळे

मुलगा किंवा मुलगी हा भेद करणेच चुकीचे आहे. सर्वप्रथम आपल्या घरातच हा भेदभाव केला जातो आणि पुढे तो समाजात रुजतो. मुलगी नको असणाऱ्यांचे वैचारिक प्रबोधन करणे गरजेचे आहे. मुलगी नको असा विचार समाजात रुजविणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावीच. पण, अशा लोकांना मानसिक साक्षर बनविले पाहिजे.
- ॲड. सुप्रिया कोठारी

मुलींना कुटुंबातच दुय्यम स्थान दिले जाते, हे थांबले पाहिजे. सरकारी योजनांचे आमिष दाखवून बदल होत नाहीत; त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल करायला हवा. मुलगी कुटुंबाला आधार देते. मग, तिचा जन्म आपण का नाकारतो? मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याविषयी जनजागृती करण्याकरिता प्रत्येक स्तरावर विचार मंच बनविले जावे.
- संगीता तिवारी

तुम्ही दुर्बल आहात, मुलांपेक्षा मागे आहात, हा विचार मुलींमध्ये तिच्या जन्मापासूनच रुजवला जातो. सर्वप्रथम पालकांनी हे थांबवावे. मुलींना जगण्याचा आत्मविश्‍वास द्यावा. त्यांना उच्चशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
- अनघा परांजपे-पुरोहित

मुलगी वाचवा याविषयावर समाजप्रबोधन करणे काळाची गरज आहे. स्त्री-पुरुष समानता यावरही जनजागृती करायला हवी. त्यासाठी शाळा-महाविद्यालय पातळीवर प्रकल्प राबविले जावेत. मुलीच्या जन्माला नाकारण्यापेक्षा त्यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जावा.
- अपर्णा सातपुते

महिलांचे अधिकार, कायदे अशा विविध विषयांवर लेखमाला सुरू करावी. महिलांना त्याच्या अधिकाराची जाणीव नाही, ती करून दिली पाहिजे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच सरकारी योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचविली पाहिजे.
- सूरज पोळ

मुलगी आणि मुलगा असा भेदभाव संपला पाहिजे. समाजात स्त्री-पुरुष समानतेची मानसिकता रुजेल, तेव्हाच स्त्रियांना त्यांच्या जगण्याचा अधिकार मिळू शकेल. प्रत्येक माणूस हा सक्षम असतो. म्हणून स्त्री-पुरुष समानतेचा जागर करण्यासाठी प्रबोधन कार्यक्रम राबवावे.
- ॲड. सोनाली मुळे

संस्कृती ही पुरुषांएवढीच स्त्रियांमुळेही बळकट होते. मग, स्त्रीला व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार का दिला जात नाही, हा प्रश्‍न पडतो. याबाबत जनजागृती करण्यासाठी सर्वप्रथम शाळा-महाविद्यालयांमध्ये उपक्रम राबविले जावेत. शिवाय मुलीच्या जन्माचा मनापासून स्वीकार करावा. 
- डॉ. मुक्तजा मठकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news girl Welcome to Female Born