हृदयाबरोबर खिशाचीही काळजी...!

सलील उरुणकर
शनिवार, 31 मार्च 2018

हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे निदान झाल्यावर तुम्हाला स्वाभाविकच ‘धक्का’ बसतो. अशा आजारांचे निदान करताना तुम्हाला ‘आर्थिक धक्का’ बसू नये, यासाठी ‘फ्लोरोजंट ॲनॅलिटिक्‍स’ ही स्टार्टअप काम करत आहे. हृदयाशी संबंधित आजारांचे निदान दहापटीने स्वस्तात करता येईल, असे उपकरण या स्टार्टअपने विकसित केले असून, पुढील पाच महिन्यांत ते बाजारात दाखल होणार आहे. 

हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे निदान झाल्यावर तुम्हाला स्वाभाविकच ‘धक्का’ बसतो. अशा आजारांचे निदान करताना तुम्हाला ‘आर्थिक धक्का’ बसू नये, यासाठी ‘फ्लोरोजंट ॲनॅलिटिक्‍स’ ही स्टार्टअप काम करत आहे. हृदयाशी संबंधित आजारांचे निदान दहापटीने स्वस्तात करता येईल, असे उपकरण या स्टार्टअपने विकसित केले असून, पुढील पाच महिन्यांत ते बाजारात दाखल होणार आहे. 

हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे निदान कमी वेळेत आणि कमी पैशांत करता यावे यासाठी ‘फ्लोरोजंट ॲनॅलिटिक्‍स’ या विज्ञानाधारित स्टार्टअपने एक उपकरण बनविले आहे. हे उपकरण देशातील विविध ‘डायग्नॉस्टिक लॅब’ना उपयुक्त ठरणार आहे. 

‘बिझनेस-टू-बिझनेस’ (बी२बी) असे स्वरूप असलेल्या या स्टार्टअपची स्थापना डिसेंबर २०१६मध्ये पुण्यात झाली. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (एनसीएल) मुख्य शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालेले डॉ. रमेश अण्णा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अजोय पाल, अहना दास आणि एडना जोसेफ यांनी ही स्टार्टअप सुरू केली. ‘एनसीएल’मधील अमिताभ दास यांच्यासह दोघेजण ‘सायंटिफिक ॲडव्हायझर’ म्हणून काम पाहत आहेत. 

काय आहे तंत्रज्ञान? 
जैविक प्रक्रियेतील ‘रिडॉक्‍स बॅलन्स’चे नियमन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिस्टाइन, होमोसिस्टाइन आणि ग्लुटाथायॉन या ‘बायोमार्कर्स’ची संख्या शोधण्यासाठी एक उपकरण बनविण्यात आले आहे.

यासाठी फ्लुरोसन्स-आधारित रिएजन्ट्‌स विकसित करण्यात आली आहेत. या उपकरणाचे प्रोटोटाइप सध्या बनविण्यात आले आहे. ‘लॅब टू मार्केट’अंतर्गत विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेकडून घेण्यात आले आहे. 

‘डिक्रिज्ड हिमॅटोपॉयसिस’ (नवीन रक्तपेशी कमी निर्माण होणे), ल्युकोसाईट लॉस, सोरायसिस, यकृताला इजा असे अनेक आजार सिस्टाइनच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. होमोसिस्टरिनची पातळी वाढल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका निर्माण होतो. तसेच अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, ओस्टिओपोरोसिस आणि ‘टाइप-२’ मधुमेहाशी याचा संबंध असतो. त्यामुळे कमीत कमी वेळेत ‘बायोमार्कर्स’ शोधण्याची गरज असते, त्यासाठी नवे उपकरण आणि रिएजन्ट्‌सचा उपयोग होणार आहे. 

‘बायरॅक’कडून ५० लाखांचा निधी 
‘बायोटेक्‍नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल’ (बायरॅक) आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्‍नॉलॉजी (डीबीटी) यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘बायोटेक्‍नॉलॉजी इग्निशन ग्रांट’ उपक्रमांतर्गत ‘फ्लोरोजंट ॲनॅलिटिक्‍स’ स्टार्टअपला ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून यशस्वी ठरू शकतील अशा संशोधन प्रकल्पांना अठरा महिन्यांच्या कालावधीसाठी हा निधी देण्यात आलेला असतो. 

पाच महिन्यांत बाजारात 
अजोय पाल म्हणाले, ‘‘उपकरणाचे प्रोटोटाइप बनविण्यात आम्हाला यश आले आहे. त्यासाठीची ‘मेथडॉलॉजी’ आता ‘व्हॅलिडेट’ करण्यात येत आहे. त्यासाठी काही खासगी डायग्नॉस्टिक लॅब आणि अन्य संशोधन संस्थांची मदत घेण्यात येत आहे. ही प्रक्रिया पुढील पाच महिन्यांत पूर्ण होऊन आम्ही उत्पादन बाजारात आणण्याचे ठरविले आहे.’’

‘‘अमेरिकेतील एका कंपनीकडे अशा स्वरूपाचे उपकरण आहे. मात्र त्यामध्ये एका चाचणीसाठी सुमारे पंधराशे ते दोन हजार रुपये खर्च येतो. आमच्या उत्पादनामुळे हा खर्च शंभर रुपयांच्या आसपास येईल. चाचण्यांसाठी होणाऱ्या खर्चात कपात झाल्याचा थेट फायदा नागरिकांना मिळू शकतो,’’ अशी माहिती पाल यांनी दिली.

Web Title: pune news heart care money ajoy pal