esakal | ...कोंबड्या अंडी देत नाहीत, थेट पोलिसात तक्रार !

बोलून बातमी शोधा

...कोंबड्या अंडी देत नाहीत, थेट पोलिसात तक्रार !

...कोंबड्या अंडी देत नाहीत, थेट पोलिसात तक्रार !

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : कोंबड्या अंडी देत नाहीत म्हंटल्यावर नेमके काय होईल, तर त्यांना पशुवैद्यकीय डॉक्‍टरांना दाखविले जाईल, त्यांना काही रोग झालाय का याची तपासणी केली जाईल, पण पुण्यात कोंबड्या अंडी देत नाहीत, म्हणून पोल्ट्री चालकांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तुमचा विश्‍वास बसत नाही ना, पण हे खरे आहे. भेसळयुक्त खाद्यामुळे घडलेल्या या प्रकाराबाबत पोल्ट्रीचालकांनी पोलिसांकडे न्याय मागितला आहे.

आळंदी म्हातोबा येथील लक्ष्मण मुकुंद भोंडवे हे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. भोंडवे व त्यांच्यासह अन्य पोल्ट्री चालकांनी नगरमधील एका कंपनीकडून 11 एप्रिल रोजी त्यांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांसाठी खाद्य घेतले होते. ते खाद्य कोंबड्यांना दिले. त्यामुळे त्यांच्या कोंबड्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले. त्यामुळे भोंडवे यांच्यासह अन्य पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा प्रकार त्यांनी संबंधित कंपनीला कळविला. मात्र त्यांच्याकडून भोंडवे यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या भोंडवे यांनी याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिली. संबंधीत अर्जावर गिरीश दिगंबर चंद, अनिल जवळकर, गोरख विचारे, विनोद दत्तात्रय भोंडवे व धनंजय नारायण डांगे यांच्यासह अन्य काही जणांनी स्वाक्षरी केली आहे.

हेही वाचा: पुण्यात आता देशीदारूही मिळणार घरपोच!

दरम्यान, या प्रकरणामध्ये लोणी काळभोर पोलिसांकडून पोल्ट्री व्यावसायिक, पशुवैद्यकीय अधिकारी व संबंधीत कंपनी यांची बाजु ऐकून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

"कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यामुळे कोंबड्या अंडी देत नाहीत, असे पोल्ट्री व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे संबंधीत कंपनीचे खाद्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. त्यांच्या अहवालामध्ये नेमके काय म्हंटले आहे, त्यावर पुढील प्रक्रिया अवलंबुन असेल. मात्र खराब खाद्य दिले गेले असल्यास ते संबंधीत कंपनीकडून परत माघारी घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना दुसरे खाद्य दिले जाऊ शकते.''

- राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे