गरज भारतीय बनावटीचे 'अँटिना' बनविण्याची : डॉ. स्वरूप

स्वप्निल जोगी
सोमवार, 5 जून 2017

आज प्रत्येकच क्षेत्रात आपल्याला अँटिना पाहायला मिळतात. प्रत्येकाची कार्यपद्धती भिन्न आहे, पण त्यांची आवश्यकता कालपरत्वे अधिकाधिक वाढत चालली आहे. तंत्रज्ञान कितीही उच्च असले, तरीही अँटिना निर्मितीच्या गुणवत्तेवर संदेशवहन अवलंबून असते

पुणे - ''रेडिओ कम्युनिकेशनच्या क्षेत्रात 'अँटिना' अर्थात संदेशवाहक हा एक अविभाज्य भाग आहे. गेल्या 25 वर्षांत या क्षेत्रात जगातील अनेक देशांनी मोठे पल्ले गाठले आहेत. भारतही या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. भारतीय बनावटीचे अँटिना बनविण्यावर अधिक भर दिल्यास आपण रेडिओ वेव्ह क्षेत्रात अधिक वेगाने प्रगती करू शकू," असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांनी येथे व्यक्त केले.

'इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स'च्या (आयइइइ) 'इंडियन अँटिना वीक 2017'च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. स्वरूप बोलत होते. डॉ. रघुनाथ के. शेवगावकर, संस्थेचे कुलगुरु डॉ. सुरेंद्र पाल, प्रा. के. पी. रे, प्रा. देबतोष गुहा आदी या वेळी उपस्थित होते.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी संस्थेत हा उपक्रम होत असून, येत्या 9 जूनपर्यंत त्यात विविध व्याख्याने व चर्चासत्रे होणार आहेत.

स्वरूप म्हणाले, "आज प्रत्येकच क्षेत्रात आपल्याला अँटिना पाहायला मिळतात. प्रत्येकाची कार्यपद्धती भिन्न आहे, पण त्यांची आवश्यकता कालपरत्वे अधिकाधिक वाढत चालली आहे. तंत्रज्ञान कितीही उच्च असले, तरीही अँटिना निर्मितीच्या गुणवत्तेवर संदेशवहन अवलंबून असते."

संरक्षण क्षेत्र, दूरसंचार, रडार, दळणवळण यांसह विविध क्षेत्रांत पुढे अँटिना क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाल म्हणाले, " भारतातील अँटिना तंत्रज्ञान गेल्या पाच दशकांत प्रचंड बदललेले आहे. अँटिना डिझाईन करणे हे अनेकदा आपली कसोटी पाहणारे असते. त्यामुळे एकेकाळी अँटिना या क्षेत्राला क्वचितच कुणी विद्यार्थी हात लावत असत. आज मात्र हेलिकल अँटिना, पॅराबोलीक अँटिना अशा प्रकारचे अँटिना अनेक ठिकाणी निर्माण होत आहेत."

मेटामटेरिल्सचा अँटिना क्षेत्रात उपयोग

डॉ. शेवगावकर म्हणाले, " 'मेटा मटेरियल' ही संकल्पना अँटिना क्षेत्रात अगदी नवी आहे. या क्षेत्रात मेटा मटेरियल (विद्युतचुंबकीय गुणधर्म असणारे मानवनिर्मित पदार्थ) उपयोगात आणल्यास संदेशवहनाची कार्यक्षमता वाढते. आज अनेक नव्या यंत्रणांत त्याचा वापर व्हायला सुरुवात झाली आहे."

Web Title: Pune News: India needs home made antennas