पुण्यात पहिल्यांदाच "लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' 

(शब्दांकन -संतोष भिंगार्डे) 
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

येत्या शुक्रवारी (ता. 15) "रोटरी क्‍लब ऑफ पूना वेस्ट'ने "लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' आयोजित केला आहे. खूप वर्षांनी हा कार्यक्रम पुण्यात होत आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या कार्यक्रमात अनेक अवीट गोडीची गाणी सादर होणार आहेत. या कार्यक्रमातून जमा होणाऱ्या निधीमधून क्‍लबच्या साक्षरता प्रकल्पाचा भाग असणाऱ्या शाळांच्या गुणवत्ता सुधार कार्यक्रमाला मदत होणार आहे. "सकाळ माध्यम समूह' या लाइव्ह शोसाठी माध्यम प्रायोजक आहे. या "शो'विषयी सांगताहेत संगीतकार प्यारेलाल.

लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह 
"लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह' शो आतापर्यंत आम्ही देशातच नाही तर परदेशातही केलेला आहे. लता मंगेशकर, मोहंमद रफी, आशा भोसले, किशोर कुमार, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, शब्बीर कुमार, सोनू निगम, शान, अलका याज्ञिक, सुनिधी चौहान अशा कित्येक गायक कलाकारांबरोबर आम्ही काम केले आहे. आमच्या बहुतेक शोज्‌ना सगळीकडे चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. कित्येक गाण्यांना प्रेक्षकांचा वन्स मोअर लाभलेला आहे. तब्बल तीन पिढ्यांबरोबर आम्ही काम केले आहे.

आजही लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची संगीत रजनी म्हटलं की प्रेक्षकांच्या उड्या पडतात. आमचा एक शो काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये होता. त्याला तब्बल तीस हजारांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहिलेले होते आणि टाळ्या काय किंवा शिट्या काय... आमचा शो त्यांनी अक्षरशः डोक्‍यावर घेतलेला होता. तब्बल चार तास तो शो चालला आणि नंतरच आम्हालाच तो थांबवावा लागला. सन 2010-11 मध्ये एक शो मुंबईतच केला. तेथे तब्बल 80 म्युझिशियन्स होते. सन 2012 मध्ये दुबईमध्ये शो केला. तेथे परदेशी म्युझिशियन्स आणि आपले म्युझिशियन्स अशा 50 जणांचा सहभाग होता. सन 2016 मध्ये ओम शिवम (इन अ माइनर) आणि ओम शिवम (इन द माइनर) अशा दोन पाश्‍चिमात्य सिम्फनी मी तयार केल्या. ती जर्मनीतील क्रिस्तजन जार्वी व म्युझिशियन्स टीमने सादर केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आमचा हा शो पुण्यात होत आहे याचा आनंद आहे.

पुण्यात संगीतप्रेमींची संख्या खूप आहे. त्याच संगीतप्रेमींसाठी आम्ही हा शो करीत आहोत याचा मला आनंद वाटतो. तब्बल पस्तीस म्युझिशियन्सचा ताफा आमच्याबरोबर आहे. हे सगळे म्युझिशियन्स मुंबईतीलच आहेत. आम्ही जोरदार तयारी केली आहे. पुण्यातील "रोटरी क्‍लब ऑफ पूना वेस्ट'मधील मंडळी मला येऊन भेटली. ही भेट गायक मकरंद पाटणकर यांच्या सहकार्यामुळे झाली. आम्हाला अशा प्रकारचा शो करायचा आहे असे मला त्यांनी सांगितले. सुरवातीला मी त्यांना आम्ही आता अशा शो करीत नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांची एकूणच तयारी, संगीताबद्दल असलेली त्यांची पॅशन व त्यांची सामाजिक कार्याची आवड पाहता आपलाही सामाजिक कार्यात हातभार लागेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी तयार झालो. पहिल्यांदाच पुण्यात लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो होत आहे. या शोमध्ये आमची लोकप्रिय आणि गाजलेली गाणी गायक सादर करणार आहेत. ही गाणी आम्ही विचारपूर्वक निवडलेली आहेत. ती कोणती हे आता सांगितले तर शोमधील गंमत निघून जाईल. ते प्रत्यक्ष तेथे उपस्थित राहून पाहिलेले बरे. आता या शोमध्ये नवीन काय असणार आहे तेदेखील गुपित आहे. शो संपल्यानंतर तेथील प्रेक्षक नक्कीच आम्ही एक अनोखा आणि चांगला शो पाहिला असे आम्हाला सांगतील याची खात्री आहे. साहिर लुधीयानवी, मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी... अशा सगळ्याच गीतकारांची गाणी सादर केली जाणार आहेत.

पुण्यात माझे एक घर आहे. तेथे आम्ही ये-जा करीत असतो. पुणे मला खूप आवडते. तिथल्या जेवणाची लज्जत काही भारीच असते. तेथील वडापावही मला आवडतो. अशा या पुणे शहरात लाइव्ह शो करताना मला आनंद होत आहे. तेथील लोकांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यावर तसेच त्यांच्या गाण्यांवर अफाट प्रेम केले आहे. त्यामुळे आताही त्यांचे ते प्रेम आणि तो उत्साह पुन्हा दिसेल अशी आशा मी करतो. 

"लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' 
शुक्रवार, ता. 15 
सायं 7 ते रात्री 10 
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेटजवळ 
कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका -बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड आणि अण्णा भाऊ साठे ऑडिटोरियम, पद्मावती येथे तसेच www.bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध. 
घरपोच प्रवेशिकांसाठी संपर्क -9673590220 

Web Title: pune news Laxmikant Pyarelal Live Show