लोकमान्यांचा शहरातील पहिला पुतळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुणे शहर ही कर्मभूमी. या पुण्यभूमीत टिळकांचे उचित स्मारक व्हावे, म्हणून तत्कालीन पुणे नगरपालिका (म्युन्सिपालिटी)ने महात्मा फुले मंडईजवळ (तत्कालीन रे मार्केट) लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. २३ जुलै १९२४ रोजी (लोकमान्यांच्या जन्मतिथीच्या दिवशी) टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सदस्य पंडित मोतीलाल नेहरू यांनी केले. पुणे शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच पुतळा आहे. 

पुणे - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुणे शहर ही कर्मभूमी. या पुण्यभूमीत टिळकांचे उचित स्मारक व्हावे, म्हणून तत्कालीन पुणे नगरपालिका (म्युन्सिपालिटी)ने महात्मा फुले मंडईजवळ (तत्कालीन रे मार्केट) लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. २३ जुलै १९२४ रोजी (लोकमान्यांच्या जन्मतिथीच्या दिवशी) टिळकांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे सदस्य पंडित मोतीलाल नेहरू यांनी केले. पुणे शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच पुतळा आहे. 

महात्मा फुले मंडईच्या बाहेरील बागेत घड्याळ आणि कारंज्याचा मध्यभागी हा पुतळा बसविला आहे. स्वदेशीचे पुरस्कर्ते तत्कालीन मूर्तिकार श्रीयुत वाघ यांनी हा पुतळा तयार केला आहे. भारतीय असंतोषाचे जनक असलेल्या लोकमान्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीकरिता केलेली जनभावनेला स्फूर्ती देणारी ऐतिहासिक सिंहगर्जना डोळ्यांसमोर येते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ ही ती सिंहगर्जना होय. हे शब्द पुतळ्याच्या चौथऱ्यावर कोरण्यात आल्याचे बारकाईने दर्शन घेताना दृष्टीस पडतात. गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या दिवशी गेल्या अनेक वर्षांपासून टिळकांच्या या पुतळ्याचे पूजन मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने करण्यात येते.

लोकमान्यांच्या पुतळ्याचा पूर्वेतिहास
लोकमान्यांच्या निधनानंतर चारच दिवसांनी (चार ऑगस्ट १९२० रोजी) टिळकांच्या तैलचित्राबाबत नगरपालिका सदस्यांची बैठक झाली. 
सदस्यांच्या कमिटीने तैलचित्राऐवजी संगमरवरी पुतळा उभारण्याची शिफारस केली. 
रे मार्केटमध्ये (सध्याची महात्मा फुले मंडई) तत्कालीन सदस्य कामत यांनी पुतळा उभारण्याचे सुचविले.
 सहा ते चौदा हजार रुपयांपर्यंत मूर्तिकारांनी पुतळ्याचा खर्च सांगितला.
रे मार्केटच्या बागेत घड्याळ व कारंजे यामध्ये पुतळा बसविण्यावर सदस्यांनी एकमताने शिक्कामोर्तब केले. 
मूर्तिकार वाघ आणि तालीम यांच्याकडून पुतळ्याकरता प्रथम मातीची प्रतिकृती मागविण्यात आली. 
मूर्तिकार वाघ यांनी तयार केलेल्या प्रतिकृतीस कमिटीने पसंती दर्शविली.
रुपये पंधरा हजारांमध्ये पुतळ्याचे काम श्रीयुत वाघ यांना देण्याचे निश्‍चित झाले.
पुतळा दोन वर्षांत पूर्ण करावा, अशी अट घालण्यात आली.
टिळकांच्या जन्मतिथीला पुतळ्याचे अनावरण करण्याचे ठरले. 
लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे तत्कालीन सदस्य पं. मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. 
पुतळ्याचे अनावरण आषाढ वद्य शके १८४६ अर्थातच २२ जुलै १९२४ या दिवशी झाले. 
अनावरणप्रसंगी प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. 
भारत स्वयंसेवक मंडळ, बॉय स्काऊट्‌स, महाराष्ट्र-बॅचलर मंडळ, महाराष्ट्र-क्रीडामंडळ आणि इतर अनेक संघ दक्षतेने झटत होते. 
- पुतळा अनावरण समारंभासाठी कमिटी सदस्यांसह न. चिं. केळकरही उपस्थित होते.  
 

पं. मोतीलाल नेहरू यांचे गौरवोद्‌गार - 
‘‘आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचे सर्वस्व मायभूमीच्या चरणावर अर्पण केल्याचे स्फूर्तिदायक उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक होत. आपली सर्व बुद्धी सर्वस्व ग्रंथरचनेकडे खर्चून ऋषींच्या मालिकेत नाव चमकेल असे करावयाचे की राजकीय चळवळ्यांच्या पाचवीला पुजलेल्या तुरुंगाच्या कोठडीत आयुष्याचा नाश होऊ द्यायचा, असे दोन मार्ग लोकमान्यांपुढे होते. पण त्यांनी त्यातला दुसरा मार्ग पत्करला. स्वतःला जनसेवेला वाहून घेतले! या स्वार्थत्यागाला तोड मिळणे कठीण आहे.’’ 

Web Title: pune news lokmanya tilak first statue in pune