‘आरटीई’ नोंदणीला शाळांचा थंडा प्रतिसाद 

‘आरटीई’ नोंदणीला शाळांचा थंडा प्रतिसाद 

पुणे - ‘आरटीई’ जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी राज्यातील खासगी शाळांचा प्रतिसाद यंदा लक्षणीयरित्या घटला आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीला २१ जानेवारीपासून सुरुवात झाली असताना आजअखेर राज्यातील केवळ चार हजार २७७ शाळांनी नोंदणी केली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांकडून मिळणारा हा अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन प्राथमिक शिक्षण विभागाने नोंदणीला बुधवार (ता. १०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यासाठी शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेअंतर्गत गेल्या वर्षी (२०२०-२१) राज्यातील ९ हजार ३३१ शाळांनी नोंद केली होती. या शाळांमध्ये एक लाख १५ हजार ४४६ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात शाळांची नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत नोंदणी केलेल्या शाळांमध्ये प्रवेशासाठी केवळ ५० हजार ८९ जागा खुल्या झाल्या आहेत. शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवार (ता. ९) पासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार होती; परंतु शाळांकडून नोंदणीला मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याने शिक्षण विभागाने नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी ९६२ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून १६ हजार ९४९ जागा खुल्या झाल्या होत्या; पण यंदा पुण्यातील केवळ ४६८ शाळांनी आतापर्यंत नोंदणी केली असून, आतापर्यंत सात हजार १९ जागा खुल्या होऊ शकल्या आहेत. शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी उपलब्ध होणाऱ्या जागांची माहिती मिळेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालकांचे लक्ष शाळा नोंदणी आणि उपलब्ध होणाऱ्या जागांकडे लागले आहे. 

जिल्हानिहाय नोंदणी झालेल्या शाळा व विद्यार्थी संख्या (कंसात) 

-पुणे : ४६८ (७,०१९) 
- नाशिक : ३८७ (३,९५७) 
- नागपूर : २५९ (२,४२९) 
- ठाणे : ३८० (७,७७८) 
- नगर : २९८ (२,४२४) 
- सातारा : ९२ (८४०) 
- सोलापुर : १३८ (१,१४५) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com