esakal | Pune: मुळशीकरांना बाजार समितीची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती

पुणे : मुळशीकरांना बाजार समितीची प्रतीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी व हजारो हातांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती सुरू होण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. ही बाजार समिती सुरू व्हावी, यासाठी बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत आहेत. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हक्काची जागा सध्या समस्यांनी वेढली आहे. मुळशीकरांसाठी आस्थेचा विषय बनलेल्या या विषयावर मार्ग काढण्यासाठी बाजार समिती संचालक मंडळाला न्यायालयीन लढाई लढावी लागत आहे. तसेच पर्यायी जागेबाबतसुद्धा चाचपणी सुरू आहे.

मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ताथवडे येथील ८५ एकर गायरान जमीन वीस वर्षांपूर्वी नियोजित करण्यात आली होती. परंतु, मूळ जागा मालकांचे नातेवाईक न्यायालयात गेल्याने तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे बाजार समितीला ती जागा आजपर्यंत हस्तांतरित होऊ शकली नाही.

हेही वाचा: धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून

यामुळे मुळशी तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी, बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती सुरू होण्यासाठी उशीर लागत आहे, असे असले तरी संचालक मंडळाकडून पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली आहे. या बहुप्रतीक्षित बाजार समितीमुळे या परिसरातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाच हजाराहून अधिक नागरिकांना रोजगार मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी बुचडे यांनी सांगितले.

तीन हजार गाळे

तीन हजारांहून अधिक गाळ्यांचा समावेश असलेल्या या बाजार समितीत अद्ययावत, असे जास्त क्षमतेचे गोदाम, कोल्ड स्टोअरेज, किरकोळ, ऑनलाइन लिलाव, भुसारी मार्केट, दर्जा तपासणी केंद्र, आधुनिक तंत्रज्ञान, शेती, शेतीमालासंबंधीचे माहिती केंद्र, शेतकरी निवासाची सोय, आंतरराष्ट्रीय निर्यात केंद्र, यासारखे अनेक विभाग असणार आहेत. शेतमाल आणि विशिष्ट फळे, फुले निर्यात करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: अस्तरीकरणासाठी हवेत ३०० कोटी : अशोक पवार

ही बाजार समिती मुळशीकरांच्या आस्थेचा विषय बनला असून, कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत अशी कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ताथवडे येथील बाजार समितीच्या नियोजित जागेला ताब्यात घेण्यासाठी विलंब लागत असून, शेजारीच असलेल्या पशुसंवर्धन विभागाची जवळपास १३० एकर जागा बाजार समितीला मिळावी, यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- संग्राम थोपटे, आमदार

loading image
go to top