केरळमध्ये बरसल्या मॉन्सूनच्या सरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

'मोरा' चक्रीवादळामुळे झपाट्याने वाटचाल

'मोरा' चक्रीवादळामुळे झपाट्याने वाटचाल
पुणे - बहुप्रतीक्षेत असलेला नैर्ऋत्य मोसमी पाऊस एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी (ता. 30) सकाळी केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्य भारतात दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. बंगालच्या उपसागरातील मोरा चक्रीवादळामुळे मॉन्सूनची झपाट्याने वाटचाल झाली. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्याने कर्नाटक आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही तो लवकर बरसेल, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

सोमवारी (ता. 29) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोरा चक्रीवादळ बांगलादेशच्या दिशेने पुढे सरकत असताना त्याने सोबत घेतलेल्या बाष्पामुळे श्रीलंकेतून थेट केरळ किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला. मॉन्सूनची बंगालच्या उपसागरातील शाखा ईशान्य भारतापर्यंत पोचली. तसेच अरबी समुद्रातील शाखेच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप येथून पुढील प्रवास वेगाने होईल, अशा माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

केरळात मॉन्सून दाखल झाल्यानंतर येत्या दोन ते तीन दिवस या भागात जोरदार पाऊस होणार आहे. त्याचवेळी मॉन्सून त्याचा उत्तरेकडील प्रवासही सुरू ठेवणार आहे. तो कर्नाटक दिशेने वर सरकण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र ते केरळच्या उत्तर भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मॉन्सून वेगाने उत्तरेकडे सरकत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या मध्य भागातही चक्राकार वाऱ्याचे क्षेत्र तयार झाले आहे. तसेच राजस्थानच्या पश्‍चिम भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे.

बंगाल उपसागरात तयार झालेले "मोरा' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनाऱ्याला आज धडकले. यामुळे आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा यासह अंदमान व निकोबार येथे जोरदार पाऊस झाला. किनारपट्टीला धडकलेले हे चक्रीवादळ उद्या (ता. 31) शांत होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली. येत्या चार ते पाच दिवसांत मॉन्सून केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, आणि ईशान्य भारत व्यापेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कधी?
केरळमध्ये मॉन्सून 31 मे रोजी बरसेल, असा अंदाज होता. पण एक दिवस आधीच केरळमध्ये बरसलेला मॉन्सून महाराष्ट्रात कधी पोचेल याची उत्सुकता लागली आहे. मॉन्सूनला पोषक वातावरण असल्याने पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कर्नाटक ओलांडून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात प्रवेश करेल.

पुण्यात पावसाच्या सरी
पुण्यात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. पण, दुपारनंतर आकाश ढगाळ झाले. अचानक ढगांची गर्दी वाढली आणि शहराच्या काही भागांत पावसाच्या सरी पडल्या. शहराच्या मध्य वस्तीसह कात्रज, हडपसर, शिवाजीनगर भागात पाऊस पडला. शहरात 37 अंश सेल्सिअस असलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 3.3 अंश सेल्सिअसने कमी होऊन 32.6 अंश सेल्सिअस नोंदला गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news monsoon in keral