esakal | नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी; चांदीचे मुकुट, दानपेटी पळवली

बोलून बातमी शोधा

theft thief

नाना पेठेतील शितळादेवी मंदिरात चोरी; चांदीचे मुकुट, दानपेटी पळवली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- नाना पेठेतील स्वामी समर्थ कॉम्प्लेक्‍समधील शितळादेवी मंदिरामध्ये शनिवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. या घटनेमध्ये चोरट्यांनी देवीचे चांदीचे मुकुट, सीसीटीव्ही डिव्हीआर व दानपेटीतील रक्कम असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भरत मल्लय्या कोटा (वय 40, रा. स्वामी समर्थ कॉम्प्लेक्‍स, नवावाडा, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: प्रेमात आंधळ्या परिचारिकेकडून रुग्णांच्या रेमडेसिव्हीरची चोरी, बॉयफ्रेंड करायचा विक्री

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय हे नाना पेठेतील नवावाडा येथे राहतात. नवावाडा पुनर्वसन इमारतीच्या पार्कींगमध्येच शितळादेवीचे छोटे मंदिर आहे. फिर्यादीचे वडील मल्लय्या कोटा हे संबंधीत मंदिरामध्ये दररोज सकाळी सहा वाजता देवीची पूजा करतात. त्यानंतर रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मंदिराला कुलूप लावून त्याची चावी स्वतःजवळ ठेवतात. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मंदिर बंद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडे सहा वाजता फिर्यादी व त्यांचे मंदिर पुजेसाठी मंदिरात गेले. तेव्हा, त्यांना मंदिराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर देवीचे दोन चांदीचे छोटे मुकूट, मंदिरातील दानपेटी, त्यातील रक्कम, सीसीटीव्हीचा डिव्हीआर आढळून आला नाही. मंदिरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक हेमचेंद्र खोपडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.