esakal | प्रेमात आंधळ्या परिचारिकेकडून रुग्णांच्या रेमडेसिव्हीरची चोरी, बॉयफ्रेंड करायचा विक्री

बोलून बातमी शोधा

remdesivir
प्रेमात आंधळ्या परिचारिकेकडून रुग्णांच्या रेमडेसिव्हीरची चोरी, बॉयफ्रेंड करायचा विक्री
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्णासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करताना गेल्या पाच दिवसांत १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच टोळीतील दोघांना वाठोडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २५ हजारांचे पाच इंजेक्शन जप्त करण्यात आले. शुभम सत्यनिवास अर्जुनवार (२४, नागेश्वरनगर, नागपूर) आणि ज्योती उत्तमसिंग अजित (२४, सिवनी, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: आजपासून दुपारी १ वाजेनंतर दुकाने, बाजारपेठा बंद; फक्त मेडिकल्स राहतील सुरू

रविवारी दुपारी वाठोडाचे पोलिस कर्मचारी पवन साखरकर हे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका खबऱ्याने शुभम अर्जुनवार हा रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करीत असून कुणाला तरी देण्यासाठी तो वाठोडा दहन घाटाच्या बाजूला असलेल्या देशी दारूच्या दुकानाजवळ येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई अतुल टिकले यास मिळाली. त्यावरून पोलिसांनी देशी दारू दुकानाजवळ सापळा रचला. शुभम हा (एमएच ४० एडब्ल्यू ३६४५) क्रमांकाच्या दुचाकीने येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पाच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळून आले. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेऊन त्याची सखोल चौकशी केली असता ज्योती नावाच्या परिचारिकेने त्याला हे रेमडेसिव्हिर दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी ज्योतीला ताब्यात घेतले.

हेही वाचा: अखेर त्याला काळानेच दिली शिक्षा; मुंबई बॉम्बस्फोटातील कैद्याचा कोरोनाने मृत्यू

पोलिसांनी ज्योतीची विचारपूस केली असता तिने सांगितले की, ती वर्धा मार्गावरील गायकवाड महाविद्यालयातील कोविड सेंटर येथे परिचारिका आहे. रूग्णाला लागणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन चोरून ती अर्जुन यास विकण्यासाठी देत असल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर करून पोलिसांनी त्यांची २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेतली. ही कारवाई वाठोड्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी अतुल टिकले आणि पवन साखरकर यांनी केली.

हेही वाचा: दादागिरी करणाऱ्या दबंग तरूणीचा भर चौकात खून; नागपुरातील थरकाप उडवणारी घटना

प्रेमाने दिला दगा -

ज्योती ही नर्स असून तिचे शुभमवर जिवापाड प्रेम आहे. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यामुळे ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. हीच बाब हेरून त्याने ज्योतीला रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी केली. नातेवाईकांना पाहिजे असल्याची थाप त्याने मारली. त्यामुळे ज्योतीने आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून कोविड सेंटरमधून इंजेक्शन चोरून प्रियकराला दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.