भूसंपादनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घ्या - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली.

पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून दिली.

चांदणी चौकातील नियोजित उड्डाण पुलाचे डिजिटल भूमिपूजन झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार भीमराव तापकीर यांची भाषणे झाली. त्या भाषणांत रस्त्यांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले; पण त्याचवेळी कामे वेगाने मार्गी लागली पाहिजेत, असा सूर त्यांनी धरला. त्या वेळी गडकरी यांनी भूसंपादनाच्या प्रश्‍नात लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, महामार्ग प्राधिकरणाकडे निधीची नव्हे, तर जागेची कमतरता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री म्हणाले, 'पुणे शहर आणि जिल्ह्यात पहिल्यांदाच 16 हजार कोटी रुपयांची रस्त्यांची विकासकामे होत आहेत. यापूर्वी एवढी कामे झाली नव्हती. विमान प्रवाशांच्या संख्येत 25 पटींनी वाढ झाली असून, गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून विमानतळ विस्तारीकरणाला चालना दिली. आता मेट्रो प्रकल्पही मार्गी लागला आहे.''

महसूलमंत्री म्हणाले, 'राज्यात रस्तेविकासमंत्री म्हणून काम करताना गडकरी यांनी रस्त्यांचे आणि उड्डाण पुलांचे परिमाणच बदलून टाकले आहेत. भविष्याचा विचार करून नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. म्हणूनच द्रुतगती मार्ग साकारला आणि मुंबईत 52 उड्डाण पुलांचे जाळे निर्माण झाले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे "बजेट' अवघे चार हजार कोटी, तर गडकरी यांनी तब्बल 1 लाख कोटी रुपयांची कामे सुरू केली असून, लवकरच ही कामे मार्गी लागतील.''

आढळराव म्हणाले, 'नाशिक रस्त्यावरील खेड- सिन्नर रस्त्याच्या कामाची मधल्या काळात गती मंदावली होती. बाह्यवळण रस्त्याचीही कामे रखडली होती. त्यांना वेग मिळाला पाहिजे.'' शिरोळे म्हणाले, 'शहर, पिंपरी- चिंचवड आणि हिंजवडीचा एकत्रित आराखडा तयार करण्याची गरज आहे.''

कात्रज चौकात आणि पॉप्युलरनगरमध्ये उड्डाण पूल व्हावा, अशी अपेक्षा तापकीर यांनी व्यक्त केली.

दळणवळण सुलभ हवे - पवार
शरद पवार म्हणाले, 'पुणे परिसरात ऑटोमोबाईल सेक्‍टर वाढतच आहे. 15 हजारपेक्षा जास्त टेक्‍नोक्रॅट आणि अभियंते तेथे काम करीत आहेत. त्यांनी तयार केलेली वाहने मोठ्या संख्येने निर्यात होत आहेत.

भविष्याचा विचार केला, तर पुणे- रायगडमार्गे दिघी बंदराचा विकास वेगाने व्हायला पाहिजे.'' राजगुरुनगर- चाकण या रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत चिंता व्यक्त करतानाच दळणवळण सुलभ आणि स्वस्त व्हायला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नगर नियोजन भुक्कड विभाग
शहरातील वाहतुकीच्या नियोजनाबद्दल बोलत असताना नितीन गडकरी म्हणाले, ""नगर नियोजन विभाग हा सर्वांत भुक्कड विभाग असून, असा विभाग अन्य कोठे बघितला नाही.'' त्यांच्याकडून विकास आराखडा करून घेण्याऐवजी सिंगापूरमधील किंवा जागतिक दर्जाच्या विभागांकडून आराखडे तयार करून घ्यायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.

अधिकारी काम करीत नाहीत !
"महामार्ग प्राधिकरणाकडे पैशांची अडचण नाही; मात्र प्रशासकीय अधिकारी वेळेवर काम करीत नाहीत,' ही मोठी समस्या असल्याचे मत दोन वेळा व्यक्त करून, "अधिकाऱ्यांच्या मागे दंडुका घेऊन उभे राहावे लागते,' असे त्यांनी सांगितले.

लक्षणीय उपस्थिती
या कार्यक्रमासाठी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, बाळा भेगडे, बाबूराव पाचर्णे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Web Title: pune news nitin gadkari talking