esakal | पुण्यासाठी मंगळवारी 8 हजार रेमडेसिव्हीर; आयसीयू बेड्सच्या संख्येत वाढ

बोलून बातमी शोधा

REMDESIVIR

जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी 25 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांत 6 हजार 101 रेमडीसिव्हीर इंजेक्शनचे व्हायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पुण्यासाठी मंगळवारी 8 हजार रेमडेसिव्हीर; ICU बेड्सच्या संख्येत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे- जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी 25 आणि 26 एप्रिल या दोन दिवसांत 6 हजार 101 रेमडीसिव्हीर इंजेक्शनचे व्हायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, मंगळवारी सुमारे आठ हजार रेमडीसिव्हीर उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या आहेत.

संबंधित कोविड रुग्णालयांनी औषध साठा प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयांच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात 11 एप्रिलपासून नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरी भागात सहा भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट आणि वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हीरची उपलब्धता आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in/corona-virus-updates या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना तातडीने फायर ऑडिटचे आदेश

ऑक्सिजन, आयसीयू बेड्सच्या संख्येत वाढ

जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, सुमारे साडे पंधरा हजार ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. या बेड्सच्या क्षमतेच्या तुलनेत रुग्णालयांना रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यात 590 खासगी रुग्णालयांना 26 एप्रिल अखेर 53 हजार रेमडीसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत रेमडीसिव्हीरचा रुग्णालयांना योग्य प्रमाणात पुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.