esakal | सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवित त्याच्याकडील सोनसाखळी जबरदस्तीने लुटणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने अटक केली. संबंधीत आरोपीने वाहनचोरीचे चार गुन्हे केले असून त्याच्याकडून सव्वा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवित त्याच्याकडील सोनसाखळी जबरदस्तीने लुटणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट पाचच्या पथकाने अटक केली. संबंधीत आरोपीने वाहनचोरीचे चार गुन्हे केले असून त्याच्याकडून सव्वा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.  सोरनसिंग कतारसिंग टाक (वय 20, रा. जय तुळजा भवानी वसाहत, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त कृषी अधिकारी किशोर रामचंद्र जेधे देशमुख (वय 59, रा. साईनगर, सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख हे 16 मार्चला सायंकाळच्या सुमारास हडपसरमधील ग्लायडींग सेंटर येथे चालण्यासाठी गेले होते. चालून झाल्यानंतर ते एका झाडाखाली बसले, त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चौघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दोन सोनसाखळ्या जबरदस्तीने चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, युनिट 5 च्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या संबंधीत गुन्हा हा टाक व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजले. तसेच तो फुरसुंगी येथील दुकानात सोनसाखळी विक्री करण्यासाठी येणार असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने त्यास अटक केली. पोलिसांनी मारूती ऑल्टो कार, दोन दुचाकी, दोन सोनसाखळ्या जप्त केल्या. आरोपीने हडपसर, चिंचवड, कोरेगाव पार्क आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे उघडकीस आले.गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक शेडगे, अंमलदार साबळे, दिपक लांडगे, दाऊद सय्यद, दत्ता ठोंबरे यांच्या पथकाने लावला.

राज्यात कोरोना लसीचे डोस खरंच पडून आहेत?; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

Edited By - Prashant Patil

loading image
go to top