'रोहिणीताईंमुळेच नृत्याला ऊर्जितावस्था' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'रोहिणीताईंमुळेच नृत्याला ऊर्जितावस्था'

'रोहिणीताईंमुळेच नृत्याला ऊर्जितावस्था'

पुणे - ""सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात रोहिणीताई भाटे यांनी कथक नृत्याची सुरवात केली. वेगवेगळ्या संस्था, शिकवण्या यातून जे बहरलेले, ऊर्जितावस्था मिळालेले नृत्य दिसत आहे ते रोहिणीताईंमुळेच आहे,'' अशा भावना सतारवादक उस्ताद उस्मान खॉं यांनी व्यक्त केल्या. 

पुणे महापालिकेचा "पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार' नृत्यांगना मनीषा साठे यांना उस्मान खॉं आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अरुंधती पटवर्धन (नृत्य), अरुणा केळकर (कथक), पांडुरंग मुखडे (तबला), चैतन्य कुंटे (संगीत संयोजन), अशोक शेलार (चित्रीकरण) यांनाही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नृत्यगुरू शमा भाटे या प्रसंगी उपस्थित होत्या. 

टिळक म्हणाल्या, ""सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यात पुणे शहर अग्रेसर आहे. ही परंपरा कायम राहावी.'' लहानपणापासूनच ज्यांचा सहवास लाभला, त्या गुरूंच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे, अशा भावना साठे यांनी व्यक्त केल्या. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले. 

शिक्षकांचा टॅब देऊन गौरव 
शिक्षक दिनानिमित्त पालिकेच्या आणि खासगी शाळेतील शिक्षकांना महापालिकेतर्फे "टॅब' देऊन गौरविण्यात आले. यात बाळकृष्ण चोरमले, जयवंत बोरसे, आरती चौधरी, अनिता सातकर, जयश्री हांडे, दीपक गायकवाड, अनुराधा अग्रवाल, राजश्री भोसले, साधना कोकाटे, नंदा शिंदे, सारंग पाटील, मनीषा वकांडे, दीपाली कुलकर्णी, सीमा चव्हाण, आदिनाथ पालवे, सचिन कापरे, दीपाली तारे, मीरा गिडवानी, सिस्टर मरीसा, मेधा कानेटकर या शिक्षकांचा समावेश होता. 

तावडे यांची गैरहजेरी 
सर्वपल्ली राधाकृष्ण आणि रोहिणीताई भाटे यांच्या स्मृती दिनानिमित्त महापालिकेतर्फे आयोजित शिक्षक आणि कलावंतांच्या सत्कार सोहळ्याला शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे गैरहजर होते. त्यामुळे बऱ्याच शिक्षक आणि कलावंतांनी नाराजी व्यक्त केली. तावडे येणार असल्याने अनेक शिक्षकांनी समारंभस्थळी गर्दी केली होती. मात्र या समारंभाला येणार नसल्याचे त्यांनी आज अचानक पालिकेला कळवले.

loading image
go to top