
रुबी हॉल धर्मादाय रुग्णालयात निराधार महिला पेशंटची उपचाराविना हेळसांड
विश्रांतवाडी : पुणे येथील रुबी हॉल धर्मदाय रुग्णालयात एका निराधार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला पेशंटची उपचाराविना हेळसांड होत असल्याचे नुकतेच समजले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी धर्मदाय आयुक्त यांना पेशंटसहित भेटून जाब विचारणार असल्याचे सांगितले. येरवडा येथील ख्रिश्चन दफन भूमीमध्ये दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये कमल भारत रांजणी ही ज्येष्ठ महिला एकटी राहत असून, दफनभूमीमध्येच ती देहासाठी खड्डे घेऊन नातेवाईक देईल त्या मोबदल्यात आपली पोटाची खळगी भागवते. यातच या महिलेच्या पायाचे (फॅक्चर) हाड मोडले असताना, डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगितले.
परंतु, तिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने व ती निराधार असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी तिला तातडीने रुबी हॉल धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, दुपारपासून या महिलेला तातडीच्या कक्षातच ठेवले आहे, परंतु अद्याप तिला पैसे भरले नसल्याने दाखल करून घेतले नाहीव पुढील उपचार सुरू केले नाही. याबाबत धर्मदाय कार्यालयातूनही सांगितले असता, या महिलेवर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे उपचार सुरू करण्यात आले नाही.
जर, ही महिला निराधार आहे, तिचे रेशनकार्डही दारि रेषेखालील पिवळे आहे. तिचे पती, दोन मुले यांचेही निधन झाले आहे व ती स्वतः संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत पेन्शन घेऊन आपला उदरनिर्वाह भागवते, तर अशा निराधार महिलेला या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नसेल, तर तातडीने अश्या हॉस्पिटलवर योग्य ती धर्मादाय आयुक्तांनी कारवाई करावी, अन्यथा सदर महिला रुग्णाला धर्मदाय कार्यालयात घेऊन जोपर्यंत तिच्यावर उपचार होत नाही तोपर्यंत तिथेच ठिय्या धरून बसण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी दिला आहे.
Web Title: Pune News Treatment Issue Female Patient Ruby Hall Charity Hospital
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..