
Pune News : एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा वसुंधरा पुरस्कार यंदा अनुज खरे यांना जाहीर
बारामती : एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा वसुंधरा पुरस्कार यंदा पर्यावरण अभ्यासक व वन्यजीव कार्यकर्ते अनुज खरे यांना जाहीर झाला आहे. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वर्धापनदिनी म्हणजेच सोमवारी (ता. 13) रोजी बारामतीतील चिराग गार्डन येथे संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिली.
पर्यावरण, सामाजिक, विज्ञान, शिक्षण, आरोग्य तसेच अन्य विधायक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा पर्यावरण संवर्धन व संरक्षण तसेच वन्यजीव अभ्यासक म्हणून नावलौकीक प्राप्त केलेल्या अनुज खरे यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
दरम्यान बारामती मधील ज्या मान्यवरांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे अशा काही मान्यवरांचा बारामती आयकॉन पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. गेल्या 13 वर्षांपासून एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया ही संस्था पर्यावरण संवर्धन व संरक्षण, सामाजिक, विज्ञान, आरोग्य, शिक्षण यासारख्या क्षेत्रात कार्यरत आहे. जलसंधारण व आरोग्याच्या क्षेत्रात संस्थेचे मोठे काम आहे.
अनुज खरे यांचे तीन दशकांहून अधिक काम...
राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य, राज्यातील अभयारण्यांचे अभ्यासक, राज्य शासनाच्या वनविभागाला विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, पक्षी प्राणी व वन्यजीवांचे अभ्यासक म्हणून गेली 28 वर्षे अनुज खरे कार्यरत आहेत. निसर्ग पर्यटन महामंडळाचे सदस्य, पुणे जिल्हा मानद वन्यजीव रक्षक, राज्याच्या विविध जिल्ह्यात जाऊन वन्यजीवनाविषयी त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
पर्यटकांना माहिती देणा-या गाईडसचा राज्याचा मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. पोलिस विभाग, कार्पोरेट सेक्टरमध्ये मार्गदर्शन केले आहे. पाचशेहून अधिक ठिकाणी स्लाईड शो व व्याख्याने दिली आहेत. देशभरातील विविध अभयारण्यात जाऊन निसर्ग प्रशिक्षण शिबीरे घेतली आहेत. विविध वृत्तपत्रांतून लिखाण केले आहे. पक्षी विषयावरील अभ्यास पूर्ण केला असून महाराष्ट्रातील साप पुस्तिकेचे लेखक.
राज्यात अनेक ठिकाणी पक्षी महोत्सवाचे आयोजन, पेंच, मेळघाट, ताडोबा, बोर, सह्याद्री, नवेगाव- नागझिरा, व्याघ्र प्रकल्प, भीमाशंकर, मयुरेश्वर अभयारण्य, पन्ना, कान्हा, सातपुडा, बांधवगड या व्याघ्र प्रकल्पातील गाईडना प्रशिक्षण दिले आहे. ते उत्तम तबलावादक असून चारुदत्त आफळे यांच्या अनेक कार्यक्रमात ते साथसंगत करतात. पुण्यात नेचरवॉक संस्थेच्या वतीने मोठे काम केले आहे