लोह वाढल्याने पाण्याला वास!

लोह वाढल्याने पाण्याला वास!

पुणे - पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. मातीमिश्रित पाण्यामध्ये काही प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढल्याने पिण्याच्या पाण्याला वास येत आहे; मात्र भीतीचे कारण नसून महापालिकेकडून जागतिक मानांकनानुसार योग्य पद्धतीने पाणी शुद्धीकरण केले जात असल्याचे ‘सकाळ’ने शनिवारी केलेल्या पाहणीत निदर्शनास आले. पाणी पिण्यास योग्यच असून, धरणातील पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर पाण्याला वास येणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या वेळी कार्यकारी अभियंता (प्रभारी) लक्ष्मण थोरात, उपअभियंता डी. एस. गायकवाड, वरिष्ठ केमिस्ट मनोज भंडारी, तसेच जलतज्ज्ञ सुनील पाटकर उपस्थित होते. 

विरघळलेला प्राणवायू (मिलिग्रॅम प्रतिलिटर) 

आवश्‍यक - 4

सध्या - 7

पाण्याची चाचणी
महापालिकेकडून दररोज शहरातून सुमारे ४०० ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. घर, टाक्‍या, सार्वजनिक नळांतून पाण्याचे नमुने घेऊन त्यातील ४३ घटकांची तपासणी येथील प्रयोगशाळेत केली जाते. 

प्लॅस्टिक कचरा
खडकवासला धरणातून कॅनॉलद्वारे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते. मात्र, या पाण्यामध्ये थर्माकॉल, प्लॅस्टिक आणि प्रचंड कचरा असल्याचे या ठिकाणी दिसून आले. 
 

धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचा परिणाम; चिंता नसल्याचे महापालिकेचे मत

पाण्याला मातकट वास येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने शनिवारी पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन येथील प्रक्रियेची पाहणी केली. खडकवासला धरणात गेल्या वर्षी जुलैमध्ये १४.३२ टीएमसी पाणीसाठा होता; मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने केवळ १०.६ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. पाण्याने तळ गाठल्याने साठलेल्या पाण्यात काही प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढले आहे, त्याचबरोबर टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळेही वास येत असल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तवली. मात्र, सध्या पाऊस होत असल्याने पाणीसाठा वाढल्यावर पाण्याला वास येणार नाही, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला.

खडकवासला धरणातील पाणीपातळी खालावल्याने गाळमिश्रित पाणी येत असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याला मातकट वास येत आहे. महापालिकेकडून पाणी शुद्ध करण्यात येते; मात्र वास पूर्णतः घालविणे शक्‍य नाही. पाऊस झाल्यावर पाणीपातळी वाढेल, तेव्हा पाण्याला वास येणार नाही. 
- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग

पुणे महापालिकेमार्फत पुरविण्यात येणारे पाणी हे पिण्याच्या पाण्याचे मानक आय.एस.१०५००:२०१२ नुसार पूर्णतः पिण्यास योग्य आहे. 
- मंदार सरदेशपांडे, केमिस्ट, पर्वती जलकेंद्र

पाण्याला मातकट वास येत आहे. महापालिकेकडून योग्य पद्धतीने पाणी शुद्धीकरण करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. 
- सुनील पाटकर, जलतज्ज्ञ

वाळूची दररोज स्वच्छता
गाळण्यांतील वाळू पाण्याच्या प्रेशरने दररोज दोनदा स्वच्छ केली जाते. पावसाळ्यात पाणी गढूळ झाल्यावर ही प्रक्रिया जास्त वेळा करावी लागते.

असे होते शुद्धीकरण
धरणातून कॅनॉलद्वारे शुद्धीकरण केंद्रात गढूळ पाणी आल्यानंतर सर्वप्रथम या पाण्याला १६ ते १८ मिलिग्रॅम प्रतिलिटर असा द्रवरूप तुरटीचा डोस दिला जातो. त्यानंतर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी १.८ मिलिग्रॅम प्रतिलिटर क्‍लोरिन गॅस मिसळला जातो. पाणी ढवळ्यात आल्यानंतर तुरटीमुळे पाणी कापूस पिंजारल्यासारखे दिसते आणि त्यातील शेवाळ, मातीसारखे जड घटक अर्थात साका तळाशी जातो. पाणी निवळण्याच्या या प्रक्रियेनंतर बऱ्यापैकी स्वच्छ झालेले पाणी गाळण्यांमध्ये (फिल्टर बेड) येते. या ठिकाणी अशा २६ गाळण्या आहेत. प्रत्येक जाळीमध्ये तीन फूट जाडीचा वाळूचा थर (गोंध्रा सॅण्ड) असतो. निवळलेले पाणी गाळणीत आल्यावर वाळूतून पाझरते.

राहिलेली घाण, सूक्ष्म घटक वाळूमध्ये अडकतात आणि स्वच्छ पाणी खाले जाते. या गाळण्यांच्या खाली असणाऱ्या नोझलमध्ये येते. या नोझलमधील फटींमधून पाणी थेंबाथेंबाने साठून प्रवाहानिशी साठवण टाक्‍यांमध्ये जाते. वास्तविक एवढ्या प्रक्रियेनंतर हे पाणी पिण्यायोग्य होते. मात्र टाकी, वाहिन्यांमधील गळती आणि इतर कारणांमुळे पाणी प्रत्यक्ष नागरिकांच्या घरात पोचेपर्यंत पुन्हा दूषित होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पाण्यात क्‍लोरीनची मात्रा कायम राहावी, यासाठी साठवण टाक्‍यांमध्येही १ या ठिकाणी मिलिग्रॅम प्रतिलिटर इतका क्‍लोरिनेशन केले जाते. ही सर्व प्रक्रिया भारतीय मानक ब्यूरो आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com