स्वच्छतागृहाअभावी स्मार्ट पुण्यात महिलेचा बळी

स्वच्छतागृहाअभावी स्मार्ट पुण्यात महिलेचा बळी

पुणे - मंगळवार...कात्रजचा भाजीपाल्याचा बाजार भरलेला. त्यासाठी पंचक्रोशीतून शेतकरी, महिला-भगिनी, ग्राहक येतात. अशीच एक भाजीविक्रेती महिला नेहमीप्रमाणे बाजारात आली. सायंकाळच्या वेळी लघुशंकेसाठी गेली आणि परत आलीच नाही. काही तासांनी तिचा मृतदेह सापडला, फर्लांगावर. सारंच धक्कादायक. पोटच्या चार मुलांना सोडून ती गेली, तिचा काहीही दोष नसताना. याला जबाबदार कोण? आपली व्यवस्था. मानवी चेहरा हरवलेला विकास! 

पुणे वेगाने प्रगती करत आहे हे मान्य; पण त्यातून मानवी चेहरा हरवत चालला आहे की काय? अशी शंका दिवसेंदिवस बळावत चालली आहे. प्रगती माणसांसाठी आहे की निव्वळ पुढे जाण्याचा दृष्टिकोनरहित अट्टहास, हेच आता समजेनासे झाले आहे. मानवाच्या मूलभूत गरजाच भागत नसतील तर तो विकास काय कामाचा? असा सवाल भविष्यकाळात सर्वांचा पाठलाग करून "सळो की पळो' करून सोडू शकतो. 
नवीन वर्षाचा दुसराच दिवस नाकाडे कुटुंबासाठी काळ ठरला. सारे शहर कोरेगाव भीमाची घटना आणि नववर्षाच्या चर्चेत असताना अनिता वामन नाकाडे या 45 वर्षीय महिलेचा हकनाक बळी गेला. नाकाडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे स्वत: अनिता भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावत. गेल्या दोन तारखेला त्यांनी कात्रज मंडईबाहेरील जागेत दिवसभर भाजी विकली. सायंकाळच्या सुमारास लघुशंकेसाठी त्यांना तेथून जावे लागले. तोपर्यंत तेथे मुलगा आणि सासूबाई थांबल्या. 

नेहमी काही मिनिटांत येणाऱ्या अनिता तासभर झाल्या तरी लघुशंकेवरून आल्या नाहीत, त्यामुळे मुलाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने शोध सुरू केला. दरम्यान, गणेश पार्कजवळून जाणाऱ्या रस्त्यावर एका गाडीच्या आडोशाला एक महिला पडल्याचे तेथून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आले आणि पोलिसांना खबर दिली. या परिसरात लघुशंकेसाठी जागाच नसल्याने अशा आडोशाचा आधार घ्यावा लागतो. अनिता यांनी देहधर्मासाठी आडोसा शोधला; पण त्याचवेळी तेथे तुटून पडलेल्या वीजवाहक तारांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वच्छतागृह नसल्यानेच त्यांचा बळी गेला, असे म्हणावे लागेल. कात्रजच्या नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्याच्या बाजूला मंडई उभी करण्यात आली. तेथे रोज शेकडो ग्राहकांची ये-जा असते; पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृह असावे, असे मंडई वसवताना का लक्षात आले नसेल? अनिता यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? महापालिका तर आहेच, शिवाय वीजवाहक तार तुटूनदेखील त्याची वेळीच दखल न घेणारी संबंधित यंत्रणा त्याहून अधिक जबाबदार आहे. नाकाडे कुटुंबावर केवढा मोठा आघात या हलगर्जीपणामुळे झाला आहे, त्याची भरपाई आता कशामुळेही होणार नाही; पण यातून काही धडे घेतले तरच भविष्यात अशा घटना टाळता येऊ शकतील. 

पुणे शहराचा कोणताही भाग घ्या, तेथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यात महिलावर्गाचा अभावानेच विचार झालेला दिसतो. त्यामुळे शहरामध्ये महिलांची प्रचंड कुचंबणा होते. काही वर्षांपूर्वी केलेल्या एका पाहणीत महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी नसल्याने त्यांना विविध आजार होत आहेत, असा निष्कर्ष निघाला होता. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार दर दीड किलोमीटर अंतरावर किमान एक तरी स्वच्छतागृह असावे, असा नियम आहे. त्याचे पालन शहरात होते काय, हे आपणाला दिसतेच. एका अंदाजानुसार सुमारे 300 स्वच्छतागृहांचा "बॅकलॉग' आहे. त्यात मध्यवर्ती पुण्याचा "बॅकलॉग' पन्नासच्या वर जातो. जी काही स्वच्छतागृहे शहरभर आहेत, त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की लोक आत जाण्यापेक्षा बाजूलाच लघुशंका उरकणे पसंत करतात. 

एकीकडे शहर वेगाने विस्तारत असताना छोट्या पण महत्त्वाच्या बाबींकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरातील दुर्घटनांचे, विशेषत: अपघातांचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसते. नादुरुस्त गाड्या, सुमार वेग आणि अक्षम्य हलगर्जीपणा ही प्राथमिक कारणे समोर आली आहेत. "पुणे शहर हादसों का शहर...' असे चित्र आता अधिक ठळकपणे दिसत आहे; मात्र अशा घटना कमी करण्यासाठी संघटित प्रयत्न होताना दिसत नाहीत. पुणे वाढत आहे, आता "स्मार्ट'ही होत आहे; पण ते सुरक्षित नसेल, तर या वाढीचा काय फायदा? नुसताच जीडीपी वाढला आणि मानवी चेहरा हरवत गेला तर...आपल्या सर्वांच्या स्वप्नातले पुणे कधी तरी असे होते का? 

खासगीकरणाचे मॉडेल अन्‌ पालिकेचा नाकर्तेपणा 
खासगीकरणातून स्वच्छतागृहांची देखभाल हा विचार पूर्वी हास्यास्पद ठरला होता; परंतु बांधकाम व्यावसायिक संजय देशपांडे यांनी नळस्टॉप येथे हा विचार मूर्त स्वरूपात आणला आणि एक स्वच्छतागृह दत्तक घेऊन पुण्यासमोर "मॉडेल' उभे केले. स्वच्छतागृहे ही शहराची मूलभूत गरज आहे. हे एकदा पटल्यानंतर जेथे जेथे शक्‍य आहे तेथे ती खासगीकरणातून चालवली जायला काय हरकत आहे. देशपांडे यांच्या मॉडेलचा विस्तार करण्यास पुणे महापालिका का कुचराई करत आहे? हे समजत नाही. "सुलभ शौचालय' हेदेखील चांगले मॉडेल होते; परंतु त्यांची संख्या खूपच मर्यादित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com