देशातील अघोषित आणीबाणीला केंद्रात भाजपचा पराभव हेच उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nikhil Wagale

लोकशाही उत्सव समितीच्यावतीने ‘लोकशाही...कुणीकडून कुणीकडे?’ या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून निखिल वागळे बोलत होते.

Nikhil Wagale : देशातील अघोषित आणीबाणीला केंद्रात भाजपचा पराभव हेच उत्तर

पुणे - देशातील भाजप सरकारकडून सध्या नागरिकांवर अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांवर दडपशाही केली जात आहे. या दडपशाहीसाठी कधी पैशांचे आमिष तर, कधी सरकारी यंत्रणांमार्फत कारवाईचा धाक दाखविला जात आहे. यामुळे सध्या प्रसारमाध्यमांची अवस्था दयनीय झाली असून, माझ्या पत्रकारितेच्या ४५ वर्षाच्या कालखंडात प्रसारमाध्यमांची एवढी दयनीय अवस्था कधीच पाहिली नाही. लोकशाही वाचविण्यासाठी आणि अघोषित आणीबाणी रोखण्यासाठी केंद्रात भाजपचा पराभव करणे, हे एकमेव उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी (ता.२७) पुण्यातील एका जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.

लोकशाही उत्सव समितीच्यावतीने ‘लोकशाही...कुणीकडून कुणीकडे?’ या विषयावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्त्री चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. नागमणी राव या होत्या. यावेळी कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. अजित अभ्यंकर, लोकशाही उत्सव समितीचे सचिव मिलिंद आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

वागळे पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित बीबीसी इंडियाने एक माहितीपट तयार केला होता. या माहितीपटावर केंद्र सरकारने बंदी घातली. परंतु ही बंदी घातल्यामुळेच नंतर तो माहितीपट अधिकाधिक जणांनी पाहिला. त्यावर बंदी घातली नसती तर, कोणाला याबाबत फारसे कळलेही नसते. दुसरीकडे केंद्र सरकारने आर्थिक सर्वेक्षणाच्या नावाखाली बीबीसी इंडियाच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकले. पण छाप्यात आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात आलीच नाही. त्याऐवजी संपादकीय विभागातील सहकाऱ्यांना वेठीस धरले. त्यांचे मोबाईल काढून घेतले. आमच्या विरोधात गेलात तर, प्रत्येक माध्यमांची हीत गत केली जाईल, असा संदेश या घटनेतून त्यांनी दिला आहे.’

‘नवख्या पत्रकारांनो, सामाजिक माध्यमे’

केंद्र सरकारने दडपशाहीच्या माध्यमातून माध्यमांची मुस्कटदाबी सुरु केल्याने, यापुढे पत्रकारितेत येणाऱ्या नवख्या पत्रकारांना त्यांच्या दैनिकांतून किंवा इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून वस्तुस्थिती मांडताच येणार नाही. तुमची इच्छा असली तरी पैशांचे आमिष किंवा कारवाईच्या भितीपोटी तुमच्या प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन हे प्रसिद्ध करूच शकणार नाही. यासाठी यापुढे पत्रकारितेत येणाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक लिखाणासाठी सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक वापर करावा, असा सल्ला निखिल वागळे यांनी यावेळी उपस्थित तरुण पत्रकारांना दिला. लोकशाही उत्सव समितीचे मिलिंद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या सभेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. मुक्ता शिंगटे यांनी सूत्रसंचालन केले.

अदानी प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय दबाव - अभ्यंकर

यावेळी बोलताना प्रा. अजित अभ्यंकर यांनी ‘हिंडेनबर्ग अहवाल आणि अदानी प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. विरोधी पक्षांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेक वेळा केली. परंतु मोदी यांनी त्यांच्या पाऊण तासांच्या भाषणात या प्रकरणाचा साधा उल्लेखही केला नाही. याचाच अर्थ या प्रकरणामागे पंतप्रधान मोदी यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव असला पाहिजे, असे मत प्रा. अभ्यंकर यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :BjpIndiapuneemergency