Pune : पासपोर्टच्या पोलिस पडताळणीसाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. अभिनव देशमुख

Pune : पासपोर्टच्या पोलिस पडताळणीसाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही

बारामती : पासपोर्टसाठी पोलिस पडताळणी करताना स्थानिक पोलिसांनी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक आहे का आणि त्या व्यक्तीविरुध्द कोणते गुन्हे प्रलंबित आहे किंवा न्यायालयाचे वॉरंट प्रलंबित आहे काय या दोनच बाबी तपासाव्यात अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. अपवादात्मक परिस्थिती वगळता पासपोर्टच्या पोलिस पडताळणीसाठी पोलिस ठाण्यात जावे लागणार नाही.

पासपोर्टच्या पोलिस पडताळणीमध्ये दिरंगाईबाबत सकाळने बातमी प्रसिध्द केली होती. या बाबत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिका-यांना सूचना दिल्या आहेत.

डॉ. देशमुख यांनी दिलेल्या सूचनेमध्ये नमूद केले आहे की, सन 2018 मधील नवीन प्रक्रीयेनुसार पासपोर्ट पडताळणीमध्ये पोलिसांनी फक्त नागरिकत्व व गुन्ह्यांबाबतचीच पडताळणी करायची आहे. संबंधित व्यक्तीने पासपोर्ट काढण्यासाठी जी कागदपत्रे पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये दाखल केलेली आहेत, ती कागदपत्रे खरी आहे अथवा खोटी आहेत याची तपासणी करण्याची पोलिसांना आवश्यकता नाही. ते काम पासपोर्ट सेवा केंद्राचे आहे. तसेच त्या व्यक्तीचा पत्ता पडताळण्याची गरजही पोलिसांना यामध्ये नाही.

पासपोर्ट पडताळणीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी जाण्याची अथवा त्याला पोलीस ठाण्यात बोलण्याचीही आवश्यकता नाही. त्या व्यक्तीबाबत एखादी गोष्ट संशयास्पद वाटत असेल तरच पोलिसांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेणे गरजेचे आहे. या पुढील काळात अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलिस पडताळणीसाठी कोणालाही पोलिस ठाण्यात बोलावायचे नाही.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

ज्यांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावायचे आहे त्या बाबतचे लेखी आदेश उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या स्वाक्षरीने काढूनच त्यांना चौकशीला बोलवावे. गोपनीय काम करणा-या कर्मचा-यांकडून पासपोर्ट पडताळणीचे काम काढून ते महिला पोलिस कर्मचा-याकडे सोपवावे.

भारताचे नागरिकत्व व प्रलंबित गुन्हेगारी न्याय प्रक्रिया वगळता इतर कुठल्याही कारणासाठी पोलिसांनी पाठविलेला प्रतिकूल रिपोर्ट पासपोर्ट विभागातर्फे ग्राह्य मानला जात नाही. असे असतानाही पोलीस पडताळणीसाठी अनावश्यक वेळ वाया घालवला जातो, लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले जाते त्यांच्याकडून अनेक कागदपत्रे मागितली जातात.

ही प्रक्रीया राबवली जाणार....

• व्यक्तीच्या नागरिकत्वाची खात्री त्याचे नागरिकत्व डोमिसाईल प्रमाणपत्र पाहून व गावातील पोलीस पाटील यांना फोन करून तात्काळ करून घ्यावी.

• संबंधित व्यक्तीवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी सी.सी.टी.एन.एस. ,कोर्ट चेकर व ई कोर्ट यावर ऑनलाईन तपासणी करून दोन दिवसाच्या आत पोलीस पडताळणीचा रिपोर्ट पोलिस अधीक्षक कार्यालयाला पाठवण्यात यावा.

• जिल्हा विशेष शाखेने दोन दिवसाच्या आत रिपोर्ट पासपोर्ट केंद्राला पाठवावा असे निर्देशच डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.

loading image
go to top