
सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल
चंदीगढ: पंजाब विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यंदाच्या निवडणुका या खास ठरणार आहेत. याचं कारण असं की, सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसमधील चित्र सध्या फारसं आलबेल नाहीये. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडली आहे आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. दुसरीकडे ज्वलंत असलेला कृषी कायद्याच्या मुद्यांवर भाजपने यु-टर्न घेतला आहे. त्यामुळे अकाली दल आणि भाजपचं सुत पुन्हा जुळतंय का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये शिरकाव करु पाहणारा आम आदमी पक्ष ऍक्टीव्ह मोडवर आहे. या पार्श्वभूमीवरच अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
केजरीवाल यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांच्यावर टीका करताना त्यांना 'खोटा केजरीवाल' असं म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की, सध्या एक खोटा केजरीवाल देखील फिरत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री माझीच आश्वासने आहे तशी कॉपी करत असल्याचा दावा त्यांनी करत त्यांना खोटा केजरीवाल अशी उपाधी दिली आहे. टीका करताना केजरीवाल यांनी म्हटलंय की, एक खोटा केजरीवाल सध्या फिरत आहे. जी काही आश्वासने मी पंजाबमध्ये देतो आहे, तीच आश्वासने हा खोटा केजरीवाल दोन दिवसांनी देतो आहे. तो काम करत नाही, कारण तो खोटा आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात महिलांसमोर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
त्यांनी म्हटलंय की, जर आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये सत्ता मिळाली तर, पंजाबमधील वय वर्षे 18 वरील सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये देण्याची योजना अंमलात आणली जाईल. ही जगातील सर्वांत मोठी योजना ठरेल, अशा शब्दात त्यांनी या योजनेचं वर्णन केलं आहे. ते पुढे म्हणाले की यामुळे प्रत्येक स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईल आणि त्यांना त्यांच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांकडून पैसे मागण्याची वेळ येणार आहे.
प्रत्येक कुटुंबातील महिलेला हे पैसे मिळतील. यापूर्वी कुठल्याच सरकारने हे करुन दाखवलं नाहीये. मी अशा अनेक महिलांना जाणतो ज्या कॉलेजला जाऊ शकलेल्या नाहीयेत. मात्र, आता त्या जाऊ शकतील. एक हजार रुपये फार नाहीयेत मात्र, हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करण्यासाठी याची नक्कीच मदत होऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.