इंग्रजीचा तिरस्कार नव्हे; तर मातृभाषेचा पुरस्कार व्हावा : उपमुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

‘नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण यावर भर दिला आहे. इंग्रजी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे, तिचा तिरस्कार करून चालणार नाही. पण मातृभाषेचा ‘पुरस्कार’ केला पाहिजे.

Devendra Fadnavis : इंग्रजीचा तिरस्कार नव्हे; तर मातृभाषेचा पुरस्कार व्हावा - उपमुख्यमंत्री

पुणे - ‘नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण यावर भर दिला आहे. इंग्रजी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे, तिचा तिरस्कार करून चालणार नाही. पण मातृभाषेचा ‘पुरस्कार’ केला पाहिजे. विकसित देशांमध्ये माणसांच्या जडणघडणीत त्यांच्या मातृभाषेचा मोठा वाटा असतो. त्याचप्रमाणे आता आपणही अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीत आणत आहोत. मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभी करण्यात येत आहे,’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुकुंद जाधव, मुकुंद माधव ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, प्रभारी कार्यवाह आशिष पुराणिक, विश्वस्त जगदीश कदम, रवी आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना गुणानुरूप विकसित होण्याची संधी मिळणार असल्याचे उद्‌गार फडणवीस यांनी काढले. ते म्हणाले,‘‘एखाद्या संस्थेची इमारत, सुविधा किती अद्ययावत आहेत, यावरून त्या संस्थेचे मूल्यमापन करता येत नाही. तर ती संस्था प्रत्येक व्यक्तीला कवेत घ्यायला तयार आहे का?, विद्यार्थ्यांना तेथे जाण्याची ओढ लागते का, विद्यार्थ्यांना हवेहवेसे वातावरण शिक्षक तयार करतात का?, यावरून संस्थेचे मूल्यमापन होते.’’ एककाळ असा होता की शिक्षक छडी घेऊन शिकवायचे. आता छडी हातात घेतली, तर शिक्षकांना तुरुंगात जावे लागते. नव्या शिक्षण पद्धतीत पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर विशिष्ट पद्धतीच्या अभ्यासाचा विचारच केलेला नाही. तर त्याउलट वयानुरूप विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा विकास व्हावा, यावर भर दिला आहे.’’

पराजयाचा इतिहास बाजूला ठेवून विजयाचा इतिहास शिकू यात

‘आतापर्यंत आपल्याला पराजयाचा इतिहास शिकविण्यात आला. हा पराजयाचा इतिहास बाजूला ठेवून विजयाचा इतिहास शिकला पाहिजे. उज्ज्वल संस्कृतीचा पुरस्कार करत संविधानिक मूल्यांची जोपासना करत पुढे जायचे आहे,’

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री