ऑक्टोबरमध्ये पुण्यात पावसाची पाठ

ऑक्टोबरमध्ये पुण्यात पावसाची पाठ
Published on: 

पुणे, ता. २ : यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात पुणे शहरात परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. संपूर्ण महिन्यात शहरातील शिवाजीनगर वेधशाळेच्या हद्दीत महिनाभरात केवळ १.७ मिलिमीटर इतक्या अत्यंत नगण्य पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या दडीमुळे शहरात कोरडे हवामान निर्माण झाले असून, तापमानात लक्षणीय वाढ जाणवत आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पुण्यात हलक्या स्वरूपाच्या सरी बरसतात. मात्र, यंदा महिनाभरात केवळ दोनच दिवस पावसाने हजेरी लावली. गेल्या अकरा वर्षांतील ऑक्टोबर महिन्याच्या पावसाच्या आकडेवारीचा विचार करता यंदाचा पाऊस अत्यंत कमी आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात पुण्यातील पावसाचे प्रमाण वर्षागणिक बदलत असल्याचे दिसून येते. २०२० मध्ये सर्वाधिक ३१३.३ मिलिमीटर, तर २०२२ मध्ये ३०३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१९ मध्येही २३५ मिलिमीटर पाऊस झाला होता. याउलट २०२३ मध्ये १८.६ मिलिमीटर, २०२४ मध्ये ६१.२ मिलिमीटर आणि २०२५ मध्ये ६७.३ मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र, यंदा या सर्व वर्षांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. गेल्या अकरा वर्षांतील आकडेवारीत २०२३ मध्ये सर्वांत कमी १८.६ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे.

यंदाच्या ऑक्टोबरमध्ये १ तारखेला १.४ मिलिमीटर, तर ३० तारखेला ०.३ मिलिमीटर पाऊस झाला. या दोन दिवसांचा अपवाद वगळता महिनाभरात पावसाची ठोस हजेरी लागली नाही. परिणामी, शहर आणि परिसरात बहुतांश काळ कोरडे वातावरण राहिले.
---------------------
ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहिले. पावसाच्या अनुपस्थितीमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविण्यात आले. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
-डॉ. एस. डी. सानप, भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे वैज्ञानिक डी.
----------------
वर्ष - ऑक्टोबरमधील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
२०१५ - ७६.७
२०१६ - ८०.४
२०१७ - १८०.९
२०१८ - ३६.१
२०१९ - २३५.०
२०२० - ३१३.३
२०२१ - १४०.२
२०२२ - ३०३.५
२०२३ - १८.६
२०२४ - ६१.२
२०२५ - ६७.३
२०२६ - १.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.